‘ताकारी’चे आवर्तन लांबल्याने तीव्र टंचाई, शेतीबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 12:48 AM2017-12-13T00:48:27+5:302017-12-13T00:51:29+5:30
देवराष्ट्रे : कडेगाव, पलूस, खानापूर या दुष्काळी तालुक्यांना नवसंजीवनी ठरलेल्या ताकारी उपसा सिंचन योजनेचे रब्बी आवर्तन अद्याप सुरू झालेले नाही.
अतुल जाधव ।
देवराष्ट्रे : कडेगाव, पलूस, खानापूर या दुष्काळी तालुक्यांना नवसंजीवनी ठरलेल्या ताकारी उपसा सिंचन योजनेचे रब्बी आवर्तन अद्याप सुरू झालेले नाही. १० कोटी रूपयांच्या वीज बिलाच्या थकबाकीपोटी महावितरण कंपनीने वीजपुरवठा तोडला आहे. परिणामी रब्बी आवर्तन दीड महिना लांबले आहे. तालुक्यात दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली असून शेतीबरोबर पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
शेतकºयांकडून वसूल केलेली पाणीपट्टीची रक्कम कारखानदार वर्षभर वापरतात. प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा फटका शेतकºयांना बसत आहे. हजारो हेक्टरवरील ऊस अडचणीत सापडला आहे. शेतकºयांना पाणी टंचाईचा सामना करीत दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. आवर्तन लांबल्याने ताकारी योजनेच्या लाभक्षेत्रातील हजारो हेक्टर बागायत क्षेत्र धोक्यात आले आहे. मूठभर कारखानदार व प्रशासनातील कामचुकार कर्मचारी यांच्यामुळे नियमित पाणीपट्टी भरणारा शेतकरी भरडला जात आहे.
रब्बी हंगाम सुरू होऊन दीड महिना झाला तरीही प्रशासनाने ताकारीचे आवर्तन सुरू करण्यासंदर्भात कोणत्याही हालचाली केल्या नाहीत. सध्या योजनेचे ९ कोटी ४७ लाख रुपयांचे वीज बिल थकीत असल्याने वीज पुरवठा बंद आहे. गत हंगामात साखर कारखान्यांनी शेतकºयांकडून वसूल केलेली पाणीपट्टीची रक्कम अद्यापही वर्ग केलेली नाही. दरवर्षीच ही स्थिती निर्माण होत असून शासनाकडूनही पाणीपट्टीची कोट्यवधीची रक्कम येणे आहे. यंदा परतीच्या पावसाने सरासरी ओलांडत खरीप हंगाम पार पाडला.
आता रब्बी हंगाम सुरू झाला असून शेतकºयांनी गहू, हरभरा यासह इतर रब्बी पिकांची पेरणी, टोकणी केली आहे.दरवर्षी ताकारी योजनेची दोन रब्बी आवर्तने देण्यात येतात. त्यामुळे आता पाटबंधारे विभागाने योजनेचे रब्बी आवर्तन तातडीने सुरू करणे गरजेचे आहे.गत हंगामात साखर कारखान्यांनी वसूल केलेली पाणीपट्टीची रक्कम अद्यापही पाटबंधारेकडे वर्ग केलेली नाही. त्याचबरोबर जून २०१६ या कालावधित तासगाव तालुक्यासाठी येरळा नदीतून योजनेचे पाणी सोडले होते. हे पाणी लोकप्रतिनिधींच्या मागणीवरुन शासनाने टंचाईतून सोडले होते. याचे ४ कोटीचे बिल शासनाकडून येणे आहे.
याबद्दल जिल्हाधिकाºयांशी पत्रव्यवहार झाला असून शासनाकडूनही बिलाची प्रतीक्षा आहे. यावर्षीही खरीप हंगामात टंचाईतून एक आवर्तन देण्यात आले होते. त्याचेही बिल शासनाकडून येणे आहे. त्यामुळे योजनेचे आवर्तन सुरू होण्यासाठी कारखान्यांबरोबरच जिल्हाधिकाºयांनीही पुढाकार घेणे गरजेचे आहे.
पाणीपट्टी वसुली : साखर आयुक्तांना पत्र
ताकारी योजनेचे आवर्तन लांबले आहे. शासनाकडील बाकी व कार्यक्षेत्रातील कारखान्यांनी वसूल केलेली पाणीपट्टी न भरल्याने ही स्थिती ओढविली आहे. कारखान्यांकडील पाणीपट्टी वसुलीसाठी ताकारी योजनेचे कार्यकारी अभियंता प्रकाश पाटील यांनी थेट साखर आयुक्तांना पत्र पाठविले आहे. ताकारी योजना दुष्काळी जनतेसाठी वरदान ठरत आहे. मात्र शेतकरी पाणीपट्टी वेळेवर भरत असतानाही योजना सुरू होत नसल्याचे टंचाईजन्य स्थिती निर्माण झाली आहे. कारखान्यांकडील बाकी वसुलीसाठी त्रास होत आहे. या वसुलीसाठी साखर आयुक्तांना पत्र पाठविले असल्याचे पाटील यांनी सांगितले.
महावितरण कंपनीला वीज जोडण्यासाठी पत्र : पाटील
थकीत वीज बिलाची रक्कम मोठी असल्याने ती भरण्यासाठी शासनाकडील बाकी लवकर मिळणे गरजेचे आहे. ती या आठवड्यात जमा होईल. ही रक्कम जमा झाली की आम्ही अडीच कोटी रुपयांचा भरणा करु. तरी महावितरणने वीज पुरवठा जोडावा, असे पत्र महावितरण कंपनीला दिले असल्याचे ताकारी योजनेचे कार्यकारी अभियंता प्रकाश पाटील यांनी सांगितले.