सांगलीतील पुरोगामी विचारवंत, लढवय्ये कामगार नेते ॲड. के. डी. शिंदे यांचे निधन

By संतोष भिसे | Published: April 5, 2024 03:23 PM2024-04-05T15:23:48+5:302024-04-05T15:42:26+5:30

ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ, जनता दल (सेक्युलर) चे जिल्हाध्यक्ष आणि पुरोगामी विचारवंत ॲड. के. डी. तथा किसन दादू शिंदे यांचे शुक्रवारी सका‌ळी दीर्घ आजाराने निधन झाले.

Progressive thinker labor leader from Sangli Adv K D Shinde passed away | सांगलीतील पुरोगामी विचारवंत, लढवय्ये कामगार नेते ॲड. के. डी. शिंदे यांचे निधन

सांगलीतील पुरोगामी विचारवंत, लढवय्ये कामगार नेते ॲड. के. डी. शिंदे यांचे निधन

सांगली : ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ, जनता दल (सेक्युलर) चे जिल्हाध्यक्ष आणि पुरोगामी विचारवंत ॲड. के. डी. तथा किसन दादू शिंदे (वय ७१) यांचे शुक्रवारी सका‌ळी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगा, एक मुलगी, सुन, नातवंडे असा परिवार आहे. 
ॲड. अमित शिंदे यांचे ते वडील होत. मुलगी अमृता मुंबईत कामगार न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्तीस आहे.

त्यांचे मूळ गाव बेडग (ता. मिरज) हे होते. एकूण ११ भावंडांमध्ये किसन दहावे होते. कुटुंबात शिकलेले एकटेच होते. उत्तूर (जि. कोल्हापूर ) येथे हायस्कूलमध्ये काही काळ शिक्षक म्हणून नोकरी केली. १९७५ ला आणीबाणीविरोधी लढ्यात उतरले. १९७७ मध्ये जनता पक्षात प्रवेश केला. १९७७ मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपात शिक्षकांचे नेतृत्व केल्याने नोकरी गमवावी लागली. त्यानंतर एसटीच्या आटपाडी आगारात कारकून म्हणून रुजू झाले. नोकरी करतानाच एलएलबी पूर्ण केले. १९७८ ला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत प्रा. शरद पाटील, हरिभाऊ खुजट आणि नानासाहेब सगरेंच्या प्रचाराची धुरा सांभाळली.

१९८३ ला एसटीची नोकरी सोडून कष्टकऱ्यांसाठी वकिली सुरु केली. शालिनीताई पाटील यांच्याविरोधात विश्वासराव पाटील या निवडणुकीत विश्वासरावांच्या प्रचाराची जबाबदारी सांभाळली. १९८५ व १९९० मध्ये प्रा. शरद पाटील यांच्या मिरज विधानसभा मतदारसंघातील निवडणूकही हाताळली. १९९५ मध्ये कवठेमहांकाळमधून विधानसभेची व २०१४ मध्ये सांगली लोकसभेची निवडणूक स्वत: लढवली. विद्रोही सांस्कृतिक चळवळ, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, कामगार संघटना, हमाल पंचायत, मैलकुली, मस्टर असिस्टंट, अंगणवाडी सेविका आदींसाठीही सक्रिय होते. सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांतील कामगार न्यायालयात ५०० हून अधिक दावे लढविले होते. एसटी कामगार संघटना, हिंद मजदूर सभा, हमाल पंचायत, जनरल मजदूर युनियन अशा अनेक संघटनांमधून सर्वसामान्यांसाठी संघर्ष केला. 

दहाव्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या नियोजन समितीचे अध्यक्षपद भूषविले. अंनिसचे जिल्हाध्यक्ष, २०१६ मध्ये अंनिसच्या दुसऱ्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष, युगप्रवर्तक प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणूनही काम केले. १९७७ पासून जनता पक्षात, तर २००५ पासून जनता दलाचे अध्यक्ष म्हणून काम करीत होते. विविध सामाजिक संस्था, संघटनांनी अनेक पुरस्कारांनी गौरविले होते. ॲड. शिंदे यांनी आठ लघु कादंबऱ्या व पुस्तके लिहिली आहेत. सांगलीत सत्यशोधक वाचनालय सुरु केले आहे.

Web Title: Progressive thinker labor leader from Sangli Adv K D Shinde passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली