प्राचार्यांच्या शिवीगाळ, धमकीने विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 12:08 AM2017-11-29T00:08:59+5:302017-11-29T00:09:45+5:30
कवठेमहांकाळ : प्राचार्यांनी अर्वाच्च व अश्लील भाषेत शिवीगाळ करून नापास करण्याची धमकी दिल्याने लांडगेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील डी. फार्मसीच्या पहिल्या वर्षात शिकणाºया एका विद्यार्थ्याने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अक्षय नागनाथ लोकरे (वय १९, रा. टेंभूर्णी, ता. माढा, जि. सोलापूर) असे विद्यार्थ्याचे नाव असून, त्याची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी अक्षयच्या वडिलांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
लांडगेवाडी येथील नूतन कॉलेज आॅफ फार्मसीमध्ये पहिल्या वर्षात अक्षय शिकत आहे. तो आजारी असल्याने शनिवारी दुपारी न सांगता महाविद्यालयातून घरी गेला. सोमवारी (दि. २७) तो परत आला असता, शिक्षिका स्नेहल शिंदे यांनी, न विचारता घरी गेल्याबद्दल दंड भरावा लागेल, असे त्याला सांगितले. तो नियमानुसार पन्नास रुपये दंड भरण्यास तयार झाला. परंतु शिंदे यांनी पाचशे रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. यावर अक्षयने नियमानुसार दंड भरणार व वर्गात बसणार, अशी भूमिका घेतली. त्यानंतर शिंदे यांनी प्राचार्य अझरुद्दीन आत्तार यांना बोलावले. आत्तार यांनी अक्षयला अर्वाच्च भाषेत शिवागीळ केली, अपमानास्पद वागणूक देऊन नापास करण्याची धमकी दिली व उद्यापासून वर्गात येऊ नकोस, असे सुनावले. याची भीती अक्षयने घेतली होती.
त्यातूनच त्याने सोमवारी सायंकाळी विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अक्षयने विषारी द्रव्य प्राशन केले असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे, असे विद्यार्थी सांगायला गेले असता, ‘मेला तर मरू दे, मला काय करायचे’, असे उद्धट उत्तर प्राचार्य आत्तार यांनी दिले.
त्याच्या मित्रांनी तातडीने कवठेमहांकाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु प्रकृती गंभीर बनल्याने त्याला मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. ही घटना समजताच अक्षयचे आई, वडील तातडीने कवठेमहांकाळ येथे दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत याबाबत कवठेमहांकाळ पोलिसात गुन्हा दाखल झाला नव्हता.