जिल्हा परिषदेच्या सभागृहात अध्यक्षा प्राजक्ता कोरे, शिक्षण सभापती आशा पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे यांच्या उपस्थितीत समुपदेशनव्दारे पदोन्नती देण्यात आल्या. कोरोनाच्या कालावधीमध्ये जिल्हा परिषदेचे कामकाज थंडावले होते. मागील चार महिन्यांपासून नियमित कामकाज सुरू झाले. कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा विषय मार्गी लावण्याची मागणी संघटनांकडून वारंवार करण्यात येत होती. ज्येष्ठता यादीनुसार तीस जणांना पदोन्नती देण्यात आली. अधीक्षकांमधून दोन कक्ष अधिकारी, वरिष्ठ सहाय्यकमधून चार अधीक्षक, कनिष्ठ सहाय्यकातून दहा जणांना वरिष्ठ सहाय्यक, ग्रामसेवकमधून दहा जणांना ग्रामविकास अधिकारीपदी पदोन्नती देण्यात आली.
ज्येष्ठता यादीनुसार प्रारंभी समुपदेशन झालेल्या कर्मचाऱ्यांना सोयीचे ठिकाण मिळाले. त्यामुळे यादीतील मागे असलेल्या कर्मचाऱ्यांची गैरसोय झाली. समुपदेशनव्दारे पदोन्नती देण्यात आली, मात्र बहुतांशी कर्मचाऱ्यांनी लोकप्रतिनिधींमार्फत सोयीचे ठिकाण मिळविण्यासाठी प्रयत्न केला. सभापती, जिल्हा परिषद सदस्यांनीही संपर्कातील कर्मचाऱ्यांना सोयीचे ठिकाण देण्याची मागणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली. अन्य विभागातील पदोन्नतीचे विषय एप्रिलमध्ये मार्गी लावले जातील. त्यामध्ये कृषी विस्तार अधिकारी, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, आरोग्य पर्यवेक्षक यांच्या पदोन्नतीचा प्रश्न सुटणार आहे.