इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील कृष्णाकाठावरील सर्वच गावांमध्ये कृष्णा कारखान्याच्या तिन्ही पॅनलच्या उमेदवारांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग अद्यापही कमी झालेला नाही. कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून कृष्णाकाठावर प्रचाराचे रान पेटू लागले आहे.
पुणे-बेंगलोर महामार्गाच्या पूर्वेकडील कृष्णाकाठावरील गावांमधून कृष्णेच्या सभासदांची संख्या जास्त आहे. त्यामुळे येथे या निवडणुकीला महत्त्व आले आहे. नदीकाठी वसलेल्या तांबवे गावात मातब्बर उमेदवार एकमेकाविरुद्ध उभे ठाकले आहेत. सहकार पॅनलकडून लिंबाजी पाटील, संस्थापक पॅनलकडून विक्रमसिंह पाटील, रयत पॅनलकडून गणेश पाटील यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. यापूर्वी नरसिंहपूर येथून संचालकाची वर्णी लागत असे. यावेळी मात्र येथून कोणालाही उमेदवारी देण्यात आलेली नाही. या गावालगत असलेल्या बहे येथून विद्यमान संचालक जयश्री पाटील, अविनाश खरात यांना ‘सहकार’मधून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात संभाजी दमामे, तर ‘रयत’कडून सत्वशीला थोरात, मानसिंग पाटील, एच. आर. पाटील या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यालगतच्या रेठरेहरणाक्ष येथून सहकार पॅनलचे जे. डी. मोरे, केदार शिंदे, संस्थापक पॅनलचे महेश पवार, तर रयतकडून दिलीपराव मोरे एकमेव उमेदवार आहेत. बोरगाव येथून ‘सहकार’चे विद्यमान संचालक जितेंद्र पाटील, ‘संस्थापक’मधून उदय शिंदे, मानाजी पाटील, तर ‘रयत’कडून विलास पाटील उमेदवार आहेत.
बहुतांश उमेदवार जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे समर्थक आहेत. या सर्व उमेदवारांना स्थानिक पातळीवर राजकीय वारसा आहे. याव्यतिरिक्त शिरटे येथून संस्थापक पॅनलकडून विद्यमान संचालक शिवाजी आवळे यांनी, तर रयतकडून सुरेखा जयकर ऊर्फ गुलाबराव पाटील यांनीही अर्ज भरला आहे. अर्ज मागे घेण्याची मुदत १७ जून आहे. त्याअगोदरच तिन्ही पॅनलच्या उमेदवारांनी कोरोनाच्या प्रादुर्भावातच प्रचाराचा धुरळा उडवला आहे. दि. १४ जूनपासून जिल्ह्यातील सर्व व्यापारीपेठा खुल्या झाल्या आहेत. त्यामुळे १७ तारखेनंतर कृष्णाकाठावर प्रचाराचे रान पेटणार आहे. कृष्ठाकाठी यामध्ये रेठरेवगळता नेर्ले येथील सभासदांची संख्या तालुक्यात प्रथम क्रमांकावर आहे. त्यानंतर रेठरेहरणाक्ष, तांबवे, बहे, बोरगाव या गावांचा समावेश होतो. त्यामुळे या गावात आणि तेथील वाड्या-वस्त्यांवर उमेदवारांनी पायपीट सुरू केली आहे.
चौकट
कोरोनाचे आव्हान
वाळवा तालुक्यात रोज सरासरी दोनशेच्या आसपास कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातच कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यातच आता ‘कृष्णे’च्या प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे. यावर आरोग्य खात्याने उपाययोजना लागू केल्या नाहीत, तर कोरोनाला रोखणे मोठे आव्हान ठरेल.