जिल्ह्यातील नऊ टोळ्यांवर तडीपारीचे प्रस्ताव तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 04:35 PM2019-09-03T16:35:22+5:302019-09-03T16:37:38+5:30
सांगली जिल्ह्यात ९ टोळ्यांच्या तडीपारीचे प्रस्ताव तयार असून, त्यातील काही टोळ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सांगली : सध्या सुरू असलेला गणेशोत्सव आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने तयारी केली आहे. त्यानुसार १ हजार ६३३ गुन्हेगारांना नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. तसेच सांगली जिल्ह्यात ९ टोळ्यांच्या तडीपारीचे प्रस्ताव तयार असून, त्यातील काही टोळ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पोलीस अधीक्षक शर्मा म्हणाले की, सध्या सुरू असलेला गणेशोत्सव, मोहरम आणि आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पोलीस प्रशासनाच्यावतीने सर्व ती तयारी करण्यात आलेली आहे. उत्सव कालावधित अनूचित प्रकार घडू नये यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
गुन्हेगारांवरील वचक वाढविण्यासाठी मोक्का व तडीपारीसारखी कारवाई केली जाणार आहे. पुरामुळे खर्चाला फाटा देत साधेपणाने मंडळांनी गणेशोत्सव साजरा करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. जिल्ह्यात ५ हजार १६३ मंडळांच्या गणपतीची प्रतिष्ठापना झाली आहे.
सुरक्षिततेच्या दृष्टीने महापालिका क्षेत्रात सध्या ९० ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. वाहतुकीस शिस्त लागण्याबरोबरच यामुळे चोऱ्यांचेही प्रमाण कमी झाले आहे. महापालिकेकडून अजून ५० लाखांचा निधी मंजूर झाला असून, त्यातून अत्याधुनिक सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. येत्या दीड महिन्यात ही यंत्रणा कार्यान्वित होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.