लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महाराष्ट्र सरकारने राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा अचानकपणे रद्द केल्याच्या निषेधार्थ सांगलीत भाजपने पोलीस मुख्यालयासमोर आ. सुधीर गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको केला. यावेळी सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. आंदोलनामुळे सांगली-मिरज रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प होती.
आंदोलकांसमोर आ. गाडगीळ म्हणाले, येत्या १४ मार्च रोजी राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा होणार होती. त्यासाठी संपूर्ण राज्यातील मुला-मुलांनी जोरदार तयारी केली होती. सरकारने परीक्षेच्या अवघ्या ३ दिवस अगोदर परीक्षा रद्द केल्याचे जाहीर करून सर्व विद्यार्थ्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरवले आहे. परीक्षा रद्द झाल्यास विद्यार्थ्यांचे श्रम वाया जाणार आहेत. ऐनवेळी परीक्षा रद्द करून सरकार विद्यार्थ्यांचा अंत बघत आहे. कोणत्याही परिस्थितीत सरकारने १४ तारखेलाच परीक्षा घेतली पाहिजे.
ते म्हणाले, सर्व व्यवहार सुरळीत आहेत. विधानसभेचे अधिवेशन घेताना सरकारला कोणतीही अडचण वाटत नाही, मग सरकारला परीक्षा घेण्यात काय अडचण आहे? सरकारने परीक्षा रद्दचा निर्णय त्वरित रद्द करून १४ मार्चला होणारी राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा त्याचदिवशी घ्यावी, अशी मागणी केली. आंदोलनात माजी उपमहापौर धीरज सूर्यवंशी, दीपक माने, सुब्राव मद्रासी, दीपक माने, प्रियानंद कांबळे, राहुल माने, विश्वजित पाटील, किरण भोसले, प्रथमेश वैद्य, अश्रफ वांकर, अनिकेत खिलारे, अमित भोसले यांच्यासह परीक्षेला बसलेले विद्यार्थी सहभागी झाले होते.