सांगलीत आमदार सुरेश खाडे यांनी जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांना पेट्रोल पंपांवरील सुविधांसाठी निवेदन दिले, यावेळी मोहन वनखंडे, रविकांत साळुंखे, ओंकार शुक्ल आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर वाहनधारकांना मोफत हवा, पिण्याचे पाणी व स्वच्छतागृह आदी सुविधा त्वरित उपलब्ध करण्याची मागणी भाजपने केली. अनेक पंपांवर सुविधा नसल्याने गैरसोय होत असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. त्यानुसार, सुविधा उपलब्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
आमदार सुरेश खाडे, भाजपचे सरचिटणीस रविकांत साळुंखे, मोहन वनखंडे, रोहित चिवटे, ओंकार शुक्ल, महेश पाटील, प्रशांत कुलकर्णी, मनोज पाटील आदींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यांनी सांगितले की, कोरोना व लॉकडाऊनमुळे वाहनधारकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. इंधन भरण्यासाठी पंपावर गेल्यास, तेथे हवा, पिण्याचे पाणी व स्वछतागृह आदी सुविधा मिळत नाहीत. स्वच्छतागृहे अस्वच्छ, नादुरुस्त व गैरसोयीची आहेत. काही ठिकाणी कुलूप लावून बंद केली आहेत. यामध्ये महिला वाहनधारकांची मोठी कुचंबणा होते. हवा भरण्याची यंत्रे सर्रास ठिकाणी बंद अवस्थेत आहेत. याची दखल घेऊन पंपचालकांना आवश्यक कार्यवाहीचे आदेश तातडीने द्यावेत.
लॉकडाऊन काळात गॅरेज बंद असल्याने वाहनधारकांना पंपांवरील हवेशिवाय पर्याय नव्हता, पण पंपचालकांच्या बेफिकिरीमुळे सर्रास यंत्रे बंद पडल्याकडे कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.चौधरी, पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे व आमदार खाडे यांची बैठक झाली. पंपांवरील सुविधांविषयी चर्चा झाली. सर्व पंपांवर आठ दिवसांत सुविधा उपलब्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
चौकट
‘लोकमत’ने वेधले होते लक्ष
जिल्ह्यातील बहुतांश पंपांवर प्राथमिक सुविधाही नसल्याकडे ‘लोकमत’ने लक्ष वेधले होते. हवा, पाणी आणि स्वच्छतागृहे यासारख्या प्राथमिक सुविधाही दिल्या जात नाहीत. शहरातील मोजक्याच पंपांवर हवेची यंत्रे सुस्थितीत आहेत. इतरत्र बंद आहेत किंवा खासगी व्यक्तीला चालविण्यास दिली आहेत. त्याच्याकडून पैसे घेऊन हवा दिली जाते. पेट्रोल व डिझेलसाठी भरभक्कम पैसे मोजणाऱ्या ग्राहकांना माफक सुविधाही दिल्या जात नाहीत, यावर ‘लोकमत’ने प्रकाश टाकला होता.