पुणदीच्या मुस्तकीनला शासकीय यंत्रणेमुळे जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:18 AM2021-01-01T04:18:59+5:302021-01-01T04:18:59+5:30
पलूस : पलूस तालुक्यात बालविकास अधिकाऱ्यांच्या पुढाकाराने सामान्य कुटुंबातील मुलावर हृदयावरील अवघड शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. शासकीय यंत्रणेने ...
पलूस : पलूस तालुक्यात बालविकास अधिकाऱ्यांच्या पुढाकाराने सामान्य कुटुंबातील मुलावर हृदयावरील अवघड शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. शासकीय यंत्रणेने जबाबदारीने कर्तव्य बजावले; तर डोंगराएवढे कामही सहजपणे होते, याचे हे उत्तम उदाहरण आहे.
पंचायत समितीच्या अंगणवाडी तपासणीच्या कार्यक्रमांतर्गत पुणदी (ता. पलूस) येथील मुस्तकीन रफिक मुजावर या चार वर्षीय बालकाच्या हृदयाला छिद्र असल्याचे निदर्शनास आले. याबाबत बालविकास अधिकारी अभिजित पाटील यांनी मुस्तकीनच्या पालकांना भेटून संभाव्य धोक्याची माहिती दिली.
मुस्तकीनचे वडील वाळव्यातील हुतात्मा कारखान्यात रोजंदारीवर कामगार म्हणून आणि आई मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा हाकतात. अशा आर्थिक परिस्थितीत रफिक मुजावर यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. अनेक डॉक्टरांकडून माहिती घेतल्यावर या शस्त्रक्रियेसाठी तीन ते चार लाख रुपये खर्च आणि शस्त्रक्रियेबाबत संभाव्य धोकाही समजला. त्यामुळे हे कुटुंब संभ्रमात होते. अशावेळी बालविकास अधिकारी अभिजित पाटील यांनी पुढाकार घेऊन ही जर शस्त्रक्रिया केली नाही, तर बालकाच्या जीवितास धोका असल्याचे वेळोवेळी पटवून दिले. यामध्ये त्यांना डॉ. दीपक सरनाईक, डॉ. शुभांगी पाटील यांनीही समुपदेशन करून त्यांना शस्त्रक्रियेसाठी राजी केले.
मुस्तकीनला घरातून नेण्यापासून ते सर्व व्यवस्था करून राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमातून मुंबई येथील एसआरसीसी रुग्णालयात डॉ. प्रवीण शहा यांच्याकडून मुस्तकीनची यशस्वी शस्त्रक्रिया केली आणि त्याला शस्त्रक्रियेनंतर घरी आणून सोडले. आज मुस्तकीन अगदी सामान्य आयुष्य जगत आहे.
कोट
एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प पलूस आणि राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमअंतर्गत आजवर अनेक बालकांवर शस्त्रक्रिया केल्या आहेत. याचा सामान्य कुटुंबाला लाभ झाला आहे.
- अभिजित पाटील, बालविकास प्रकल्प अधिकारी, पंचायत समिती, पलूस.
फोटो-३१पलूस१