सांगली : भारतमाला रस्ते योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यातून जाणाऱ्या पुणे-बंगळुरू ग्रीन फिल्ड राष्ट्रीय महामार्गासाठी जमीन अधिग्रहण करताना शेतकऱ्यांना रेडिरेकनरच्या चारपट मोबदला दिला जाणार आहे. महामार्गालगत अशी नोंद असणाऱ्या गटांना दुप्पट मोबदला मिळेल, अशी माहिती खासदार संजयकाका पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.ते म्हणाले की, महामार्गासाठी सध्या जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू आहे. ती पूर्णता पारदर्शकपणे होणार आहे. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. शेतकऱ्यांनी घाबरून कोणालाही जमिनी विकू नयेत. जिल्ह्यातून खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ आणि मिरज या चार तालुक्यांतून ७४ किलोमीटरचा महामार्ग जाणार आहे. एकूण ३८ गावांना याचा लाभ होणार आहे. लोकांच्या शंका दूर करण्यासाठी तालुकानिहाय राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी येणार आहेत. पुढील तीन ते साडेतीन वर्षांत हा रस्ता पूर्ण केला जाणार आहे. राष्ट्रीय महामार्गासाठी लाभ मिळणार नाही, अशा अफवा पसरवल्या जात आहेत. शेतीसाठी भूमिअधिग्रहण कायद्यानुसार मोबदला दिला जाणार आहे.ते म्हणाले, जिल्ह्यात जत ते चढचण, जत-अथणी रस्त्याचा प्रस्ताव रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाकडे दिला आहे. पाचवा मैल ते सांगली, कुमठे फाटा- कवलापूर-कुपवाडमार्गे सांगली शहर अशा नव्या रस्त्याचीही मागणी केली आहे.
विमानतळासाठी पुरेशी जागा नाहीजिल्ह्यात धावपट्टीसाठी पुरेशी जागा नसल्याने विमानसेवेचा प्रस्ताव प्रलंबित आहे. जागेची उपलब्धता झाल्यानंतर हा प्रश्न मार्गी लागेल, असे पाटील म्हणाले.
जिल्ह्यातील गुन्हेगारी चिंतेचा विषयजिल्ह्यात गेल्या काही दिवसांत गुन्हेगारी वाढली आहे. अवैध धंदे व नशेच्या पदार्थांचा काळाबाजार सुरू असल्याने यातून गुन्हेगारी फोफावली आहे. येत्या चार दिवसांत उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेसाठी उपाययोजना करण्याची मागणी करणार आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीसप्रमुखांसमवेतही बैठक घेऊ, असे खासदार पाटील यांनी सांगितले.