लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : पालिकेच्या गत निवडणुकीपासून भाजपचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि आता शिवसेनेचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी इस्लामपूरच्या विकासाला निधी देण्याच्या घोषणा केल्या आहेत. मात्र प्रत्यक्षात मात्र पालिकेकडे येणाऱ्या निधीची गोळाबेरीज केली, तर शहराचा कायापालट करण्यासाठी शिल्लक असलेल्या भुयारी गटारीव्यतिरिक्त काहीही नाही. या नेत्यांच्या फक्त हवेतच घोषणा आहेत.
गत पालिका निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शहरात दोनवेळा आले. त्यांनी, इस्लामपूरच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही, अशा घोषणा केल्या. या घोषणा आजही जनतेच्या कानात घुमत आहेत. यापैकी पालिकेत शिल्लक असलेल्या निधीतून भुयारी गटारीच्या कामाला प्रत्यक्षात मंजुरी आणलेल्या सत्ताधारी विकास आघाडीला ठळकपणे वेगळा विकास करता आला नाही. पालिकेतील विकास आघाडीचे गटनेते विक्रमभाऊ पाटील यांनी स्वबळावर निधी आणला. त्यातील काही रक्कम शासनाकडून येणे बाकी आहे. याउलट सत्ताधारी विकास आघाडी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना साक्षी ठेवून १९० कोटीच्या आसपास निधी आणल्याचा दावा करते.
गेल्या चार वर्षात शहराच्या झालेल्या विकासावर स्वत: जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी प्रभाग बैठकीतून खंत व्यक्त केली आहे., तर गेल्या चार वर्षात झालेल्या विकासामुळे जनता भारावून गेली आहे. विकास राष्ट्रवादीच्या डोळ्यात खुपतो, असा आरोप काँग्रेसचे नगरसेवक वैभव पवार यांनी केला आहे, मग आपण मागे का, असा सवाल उपस्थित करत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, पालिकेतील गटनेते आनंदराव पवार यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन निधीची मागणी केली आहे.
कोट
नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यातील सर्व नगराध्यक्षांची बैठक घेतली. यावेळी शिवसेनेचा गटनेता म्हणून विकास आघाडीच्यावतीने विकास निधीसाठी निवेदन दिले. यावेळी निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन मंत्री शिंदे यांनी दिले आहे.
- आनंदराव पवार
जिल्हाप्रमुख शिवसेना
फोटो- इस्लामपूर नगरपालिका लोगो