राधा मंगेशकरांना ‘राम कदम पुरस्कार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 10:32 PM2019-09-30T22:32:59+5:302019-09-30T22:34:02+5:30
मिरज : मिरजेतील अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सवात ‘संगीतकार राम कदम पुरस्कार’ मुंबईच्या गायिका राधा मंगेशकर यांना ‘लोकमत’चे आवृत्ती प्रमुख ...
मिरज : मिरजेतील अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सवात ‘संगीतकार राम कदम पुरस्कार’ मुंबईच्या गायिका राधा मंगेशकर यांना ‘लोकमत’चे आवृत्ती प्रमुख श्रीनिवास नागे यांच्याहस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. यावेळी आयोजित शास्त्रीय संगीत कार्यक्रमात गायिका राधा मंगेशकर यांच्या गायनास श्रोत्यांनी दाद दिली.
अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी, सोमवारी सायंकाळी कोमल साने-गुरव (पुणे) यांचा शास्त्रीय संगीत गायनाचा कार्यक्रम पार पडला. त्यांना तबलासाथ प्रणव गुरव व हार्मोनियमसाथ संदीप तावरे यांनी केली. संगीत महोत्सवाच्या निमित्ताने प्रत्येकवर्षी प्रख्यात चित्रपट संगीतकार राम कदम यांच्या नावाने दिला जाणारा ‘संगीतकार राम कदम पुरस्कार’ राधा मंगेशकर यांना श्रीनिवास नागे यांच्याहस्ते व ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. जी. एस. कुलकर्णी, विजय राम कदम या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
नीला विजय कदम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. मंडळाचे अध्यक्ष मधू पाटील, विनायक गुरव, संभाजी भोसले, डॉ. शेखर करमरकर, बाळासाहेब मिरजकर यांनी संयोजन केले.
गाण्यांच्या कार्यक्रमास श्रोत्यांची दाद
पुरस्कार प्रदान सोहळ््यानंतर स्वरताल मंच पुणे प्रस्तुत संगीतकार राम कदम यांच्या मराठी गाण्यांचा कार्यक्रम पार पडला. विजय कदम, राधा मंगेशकर, मेधा चांदवडकर, सुगंध तिरोडकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी राम कदम यांची मराठी गाणी सादर केली. या कार्यक्रमास श्रोत्यांचा प्रतिसाद मिळाला.