राहुल गांधींच्या निवडीने जिल्ह्याला ताकद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 12:59 AM2017-12-06T00:59:07+5:302017-12-06T01:00:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कॉँगे्रसचे अध्यक्ष म्हणून राहुल गांधी यांच्या नावावर शिक्कामोर्तब होत असतानाच सांगली जिल्ह्यातील नेते, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वारे वाहू लागले आहे. राहुल गांधी यांचा पतंगराव कदम व वसंतदादा घराण्यातील नेत्यांशी संपर्क असल्यामुळे याचा फायदा जिल्ह्यातील पक्ष बळकटीला होण्याची संधी आहे.
राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्याशी जिल्ह्यातील नेत्यांचा थेट संपर्क आहे. वसंतदादांचे नातू प्रतीक पाटील आणि आ. पतंगराव कदम, प्रदेश युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम या नेत्यांचा गांधी घराण्याशी संपर्क अधिक आहे. विश्वजित कदम हे राहुल गांधी यांच्या सातत्याने संपर्कात राहिले आहेत. त्यामुळे या सर्व नेत्यांना राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीने आणखी ताकद मिळण्याची शक्यता आहे. पतंगराव कदम हेही सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह राष्टÑीय पातळीवरील नेत्यांच्या सातत्याने थेट संपर्कात असतात. विधानसभांच्या निवडणुकीवेळी उमेदवारी निश्चित करतानाही केंद्रीय नेत्यांशी त्यांची चर्चा होत असते. निवड प्रक्रियेत त्यांना महत्त्वाचे स्थान दिले जाते. त्यामुळे राहुल गांधींच्या निवडीने जिल्ह्यातील कॉँग्रेस नेते व त्यांच्या समर्थकांनाही ताकद मिळाल्याची भावना आहे.
पक्षाचे स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या निवडीचे स्वागत केले आहे. औपचारिक घोेषणेनंतर सांगली जिल्ह्यात जल्लोष करण्याची तयारीही कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी केली आहे. जिल्ह्यातील गेल्या वर्षभरातील कॉँग्रेसची कामगिरीही अन्य पक्षांच्या तुलनेत चांगली झाली आहे. जिल्हा परिषदेत आघाडीच्या गोंधळात कॉँग्रेसला फटका बसला होता. त्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून ग्रामीण भागात कॉँग्रेसने बाजी मारली आणि जिल्ह्यातील क्रमांक एकचा पक्ष म्हणून पुन्हा डंका वाजविला.
नुकत्याच झालेल्या आक्रोश मेळाव्यात हरियाणाचे माजी मुख्यमंत्री दीपेंद्रसिंह हुडा, मोहन प्रकाश अशा राष्टÑीय राजकारणातील नेत्यांना बोलावून कॉँग्रेसने वातावरण निर्मिती केली. त्यातच आता राहुल गांधींच्या निवडीने भर पडली आहे. राज्याच्या राजकारणातही सांगलीतील नेत्यांचा दबदबा राहिल्याने पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे लक्षही सांगलीने वेधले आहे.
सांगलीकरांकडे : महत्त्वाची पदे
सध्या युवक कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद विश्वजित कदम यांच्याकडे आहे. कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्षपदही सदाशिवराव पाटील यांच्या माध्यमातून जिल्ह्याकडे आहे. त्यांनी राजीनामा दिला असला तरी, तो अद्याप मंजूर झालेला नाही. त्याचबरोबर प्रदेश सरचिटणीसपदी सत्यजित देशमुख काम करीत आहेत. राज्याच्या पार्लमेंटरी बोर्डात सदस्य म्हणूनही विश्वजित व आ. पतंगराव कदम यांचा समावेश आहे. याशिवाय महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा म्हणून शैलजा पाटील काम करीत आहेत.