राहुरी विद्यापीठातर्फे शेटफळेत कृषी पारायणाचे आयाेजन : पी. जी. पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:26 AM2021-09-25T04:26:41+5:302021-09-25T04:26:41+5:30
आटपाडी : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील दहा जिल्ह्यांमध्ये कृषी पारायण दिवस राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याची ...
आटपाडी : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील दहा जिल्ह्यांमध्ये कृषी पारायण दिवस राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याची सुरुवात आटपाडी तालुक्यातील थोर साहित्यिक ग. दि. माडगूळकर यांच्या जन्मगाव शेटफळेपासून करण्यात येणार असल्याची माहिती राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी दिली.
पाटील म्हणाले, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कार्यक्षेत्र एकूण दहा जिल्ह्यांमध्ये आहे. या दहा जिल्ह्यांमध्ये कृषी पारायण आयोजित करण्यात येणार आहे. संशोधन केंद्र, विज्ञान केंद्र, विभागीय विस्तार केंद्रे, जिल्हा विस्तार केंद्रे यांच्या सहभागातून कृषी पारायण उपक्रम राबविला जाणार आहे. शासनाचे कृषी अधिकारी, पशुसंवर्धन अधिकारी यांचाही सहभाग घेतला जाणार आहे. राज्यात प्रथमच असा तंत्रज्ञान प्रसाराचा शेतकरीभिमुख कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.
दरम्यान, कृषी पारायण संकल्पनेची सुरुवात आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथे थोर साहित्यिक ग. दि. माडगुळकर यांच्या जन्मभूमीतून करण्यात येणार आहे. दि. २१ सप्टेंबरला शेटफळे येथे डॉ. अनिल दुरुगुडे, डॉ. अशोक वाळुंज, डॉ. देवेंद्र इंडी, डॉ. प्रकाश मोरे या विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी भेट देत शेटफळे परिसरात आलेल्या मर रोगाविषयी मार्गदर्शन केले हाेते.
चौकट
असा असेल उपक्रम
कृषी पारायणामध्ये जिल्ह्यातील एका गावाची निवड केली जाणार आहे. त्या गावातील शेतकऱ्यांच्या अडचणी समजावून घेत त्यांना शास्त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. मातीचे आरोग्य, पाण्याचा वापर, सेंद्रिय शेतीबाबत मार्गदर्शन, शेती उत्पादन कसे वाढवता येईल, स्मार्ट शेती, रासायनिक खतांचा समतोल, जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा वापर, स्थानिक हवामानानुसार शेती सल्ला यासह जनावरांसाठी चारा व्यवस्थापन, मुक्त गोठा पद्धत, मुरघास तंत्रज्ञान, शेळीपालन तंत्रज्ञान यासह अन्य विषयांवर शेतकऱ्यांशी संवाद साधला जाणार आहे.
काेट
राज्यात प्रथमच कृषी पारायण संकल्पना महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून राबविली जात आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी शास्त्रीय ज्ञान मिळेल व त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल.
- डॉ. पी. जी. पाटील, कुलगुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ