पावसाचा जोर वाढला, खरीप पिकांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:32 AM2021-07-14T04:32:02+5:302021-07-14T04:32:02+5:30
सांगली : पावसाने ओढ दिल्यामुळे खरीप हंगामातील पीक धोक्यात होती. दुष्काळी तालुक्यात तर दुबार पेरणीचे संकट होते. रविवारपासून पावसाचे ...
सांगली : पावसाने ओढ दिल्यामुळे खरीप हंगामातील पीक धोक्यात होती. दुष्काळी तालुक्यात तर दुबार पेरणीचे संकट होते. रविवारपासून पावसाचे पुनरागमन झाल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. जिल्ह्यात सोमवारी सरासरी ११ मिलीमीटर तर मिरत तालुक्यात सर्वाधिक २२.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
मान्सूनपूर्व पाऊस चांगला झाल्यामुळे जिल्ह्यात ६६ टक्क्यांहून जास्त खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. मान्सून पावसाची सुरुवात चांगली झाली, पण दि.१५ जूननंतर पावसाने उघडीप दिल्यामुळे खरीप पीक अडचणीत होते. दुबार पेरणीच्या संकटामुळे शेतकरी चिंतेत होता. अखेर रविवारपासून जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पावसाचे पुनरागमन झाल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता काही प्रमाणात दूर झाली आहे.
सोमवारी जिल्ह्यात सरासरी ११ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मिरज तालुक्यात सर्वाधिक २२.५ मिलीमीटर तर सर्वात कमी जत तालुक्यात ०.४ मिलीमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे. मिरज २२.५, जत ०.४, खानापूर १.१, वाळवा १४.४, तासगाव २१.५, शिराळा ११.५, आटपाडी २०.७, कवठेमहांकाळ ३, पलूस १३.६, कडेगाव ०.९ मिलीमीटर पाऊस झाला आहे.