शिराळा : शिराळा तालुक्यात अतिवृष्टी सुरू असून, पावसाने हाहाकार उडाला आहे. मुसळधार पावसामुळे वारणा व मोरणा नदीस तसेच शिराळा येथील तोरणा ओढा तालुक्यातील सर्वच ओढे, नाले भरुन वाहत आहेत.
नदीकाठच्या आरळा, मणदूर, सागाव, कांदे, देववाडी, मांगले, गावात वारणा नदीस आलेल्या महापुराचे पाणी शिरले आहे. खराळे येथे दरड कोसळली आहे; मात्र ही गावाच्या विरुद्ध बाजूस कोसळल्याने कोणतेही नुकसान झाले नाही. आरळा येथील बाजारपेठेत पाणी शिरले आहे. देववाडी येथील १८४२ लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे, तर २२२८ जनावरांना हलवण्यात आले आहे. मांगले, सागाव गावांत पाणी शिरले असून, नदीकाठच्या १९ गावांना वारणा नदीस आलेल्या महापुराचा तडाखा बसला आहे. नदीकाठच्या गावातील लोकांना दक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत.
कापरीमधील सूजयनगर येथील पूल कोसळला आहे. वाहतूक बंद झाली आहे. मोरणा नदीवरील कॉलनीमधून जाणार्या रस्त्यावर पुलावरील रस्ता खचला आहे.
वाहतूक बंद आहे. वारणा व मोरणाचे पाणी नदीकाठच्या शेतात शिरल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यात विद्युत पोल पडल्याने व ट्रान्सफॉर्मरमध्ये पाणी शिरल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. चांदोली धरण व अभयारण्य परिसरात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे चांदोली धरणाचे चार दरवाजे दुपारी गुरुवारी तीन वाजता उघडले आहे. चार दरवाजांतून २८२ ५० क्युसेकने विसर्ग सुरू आहे.
वारणा नदीस महापूर आला आहे. चरण-सोंडोली पूल व कोकरुड रेठरे पूल, आरळा-शित्तूर, मांगले-काखे, सांगाव-सरूड, चरण-सोंडोली पूल पाण्याखाली गेले आहेत.
चौकट
माेरणा धरणाचा दरवाजा उघडला
शिराळा येथील मोरणा धरणाच्या सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडत आहे, तसेच पहिल्यांदा या धरणाचा दरवाजाही उघडण्यात आला आहे.
चाैकट
ताेरणा ओढ्यास प्रथमच महापूर
शिराळा येथील तोरणा ओढ्यास पहिल्यांदा महापूर आला आहे. कासार गल्ली, पूल गल्ली व गोपाळ कृष्ण पाठ हे तिन्ही पूल पाण्याखाली गेले आहेत.
चाैकट
पावसाची नाेंदच नाही
पाथरपुंज हे सर्वात जास्त पावसाचे केंद्र आहे; मात्र तेथील यंत्रणा बंद पडल्याने पावसाची नोंद मिळत नाही.