ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी- जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 05:39 PM2021-02-15T17:39:23+5:302021-02-15T17:43:40+5:30

Jayant Patil Sangli- राज्यामध्ये शिक्षणासाठी वेगवेगळी पावले पडत असताना जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी नवीन संकल्पना आणणे ही पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे. यामध्ये आपल्या जिल्ह्यात एखादा वेगळा प्रयोग राबविण्यात यावा, अशी माझी आग्रहाची भूमिका असून या अंतर्गत माझी शाळा -आदर्श शाळा उपक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येईल. शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन, शिक्षक यांनी या उपक्रमास सर्वोतोपरी योगदान द्यावे, असे आवाहन राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.

To raise the standard of education in rural areas - Jayant Patil | ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी- जयंत पाटील

ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी- जयंत पाटील

googlenewsNext
ठळक मुद्देग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी- जयंत पाटील माझी शाळा- आदर्श शाळा उपक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवा

सांगली : राज्यामध्ये शिक्षणासाठी वेगवेगळी पावले पडत असताना जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी नवीन संकल्पना आणणे ही पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे. यामध्ये आपल्या जिल्ह्यात एखादा वेगळा प्रयोग राबविण्यात यावा, अशी माझी आग्रहाची भूमिका असून या अंतर्गत माझी शाळा -आदर्श शाळा उपक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येईल. शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन, शिक्षक यांनी या उपक्रमास सर्वोतोपरी योगदान द्यावे, असे आवाहन राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.

विष्णूदास भावे नाट्यगृह सांगली येथे माझी शाळा -आदर्श शाळा उपक्रम तसेच स्मार्ट ग्राम, आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार वितरण सोहळा प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार संजय पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, आमदार अरूण लाड, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार, शिक्षण व आरोग्य समिती सभापती आशा पाटील, समाज कल्याण सभापती प्रमोद शेंडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) तथा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राहूल गावडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) तानाजी लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणीपुरवठा व स्वच्छता) विजयसिंह जाधव, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, देशामध्ये जो प्राथमिक शिक्षणाचा पाया आहे याकडे आपण नेहमीच गांभीर्याने पहातो. आपल्या जिल्ह्यामध्ये आपण अशी व्यवस्था निर्माण केली पाहिजे की शिक्षणाकडे सतत लक्ष राहिले पाहिजे. यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्रित येवून काम केले पाहिजे. त्याचबरोबर प्रत्येक लोकप्रतिनिधींचे लक्ष आपल्या गावातील व भागातील शाळांकडे असले पाहिजे.

आज ही नवीन व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. बरेच प्रश्न बऱ्याच शाळांचे आहेत हे सर्व एकाचवेळी सोडविणे शक्य होणार नाही यासाठी टप्प्या- टप्प्याने सुरूवात होणे आवश्यक आहे. जिल्ह्यात या मोहिमेच्या पहिला टप्प्यात 141 शाळांची निवड करण्यात आली आहे. सुरूवात झाल्यानंतर आपण इथेच थांबणार नसून जिल्ह्यातील प्रत्येक शाळांची सुधारणी करण्यात येईल. यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभावीपणे काम करतील, असा मला विश्वास आहे.

जिल्ह्यातील शिक्षक आपल्या नवनवीन संकल्पना राबवून शाळा उत्तमोउत्तम घडतील यासाठी शिक्षक अधिक चालना देतील, असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, नवीन पिढीतील शिक्षक हे नवनवीन संकल्पना राबविणारे (इनोव्हेटीव्ह) आहेत. मुलांना कळेल अशा संकल्पना शिक्षकांकडून मांडल्या जातील असा मला विश्वास आहे. हा उपक्रम राबवताना लोकप्रतिनिधींचेही सहकार्य मिळेल असा विश्वास व्यक्त करून ते म्हणाले, या उपक्रमामध्ये एक भाग इन्फा्रस्ट्रक्चरचा आहे. या शाळांमध्ये ग्राऊंड, कम्पाउंड, शाळेच्या इमारतीच्या सुधारणा, टॉयलेट आदिंचे डिझाईन करण्यात आले आहे, ते अतिशय व्यवस्थितपणे करण्यात आले आहे.

या सर्व सुविधा पुढील काळात बरेच वर्षे चालतील असा माझा विश्वास आहे. यामध्ये मुख्याध्यापक व शिक्षकांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था अतिशय उत्तम केली आहे. यामध्ये शिक्षक आणि पालक यामधील जो संवाद आहे यालाही प्राधान्य दिले पाहिजे. त्यासाठी प्रत्येक गावात शिक्षक पालक बैठक महत्वाची असली पाहिजे. या बैठकांना गावच्या सरपंचानी लक्ष घालून त्या बैठकांना उपस्थित राहिल्यास बैठकांनाही प्रतिष्ठा प्राप्त होईल.

प्राथमिक शाळेमधील ज्या शालेय शिक्षण सुधार समित्या आहेत त्यांना निधी देणे आवश्यक आहे. या निधीमधून शाळेसाठी विशेष काम करण्याला वाव राहील, असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, यासाठी बाहेरून फंड उभारण्याची व्यवस्था करता येईल. यासाठी जिल्हा परिषदेने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अधिकार देणे आवश्यक आहे. या फंडामध्ये देणगी स्वरूपात निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू आणि त्या निधीतून तालुक्यात ज्या शाळा उत्तम काम करतील त्या शाळांना सानुग्रह अनुदान म्हणून (बोनस) दिला जाईल. जे अधिक चांगले काम करतील त्यांना बोनस देण्याची व्यवस्था करण्यात येईल. यामुळे स्पर्धात्मक वातावरण निर्माण होऊन प्रत्येक शाळा अधिक चांगल्या प्रकारे काम करेल. या मोहिमेंतर्गत शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी वाचन, लेखन आणि सर्वसाधारण गणित हे पक्के करण्यासाठी या त्रिसुत्रीला प्राथमिकता देणे आवश्यक आहे.

शाळेत येणाऱ्या मुलाला शाळेतून जावेसे वाटू नये, शाळेत आल्यानंतर मुलाला कंटाळा वाटू नये, त्याला आनंद वाटावा आणि तो आनंद निर्माण होण्यासाठी शाळेत कल्चरल क्लब, स्पोर्टस क्लब, हॉबी क्लब, शास्त्र आणि सिनेमा क्लब असे वेगवेगळे क्लब सुरू केले जातील, असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, या व्यतिरिक्त अधिकच्या चांगल्या सोयी देण्यासाठी प्रयत्न केले जातील. यासाठी आपण सर्वांनी मनावर घेतले तर या सर्व गोष्टी साध्य होऊ शकतील. सध्याच्या व्यवस्थेत अधिकाऱ्यांची व शिक्षकांची संख्या आपल्या जिल्ह्यात कमी आहे, ही कमतरता भरून काढण्यासाठी शिक्षण मंत्री यांच्याबरोबर बैठक घेऊन प्राथमिक शिक्षणांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

माझी शाळा - आदर्श शाळा हा कार्यक्रम जिल्ह्यामध्ये प्राधान्याने राबविण्यावर भर दिला पाहिजे. हा प्राधान्याने उपक्रम राबविला तर आपल्या जिल्ह्याची स्पर्धा इतर कोणताही जिल्हा करू शकणार नाही. महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये आपल्या जिल्ह्यातील मुले सर्वोत्तम आहेत हे चित्र पुढील आठ दहा वर्षात तयार होईल. या उपक्रमाची व्याप्ती मर्यादीत नसून सर्वसाधारणपणे शिक्षणाबरोबरच गुणवत्तेचा दर्जा उंचावणे आणि तेथील शिक्षण व्यवस्थेचाही दर्जा उंचावणे हाच संकल्प आहे, असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, या उपक्रमात जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधी आपला सहभाग नोंदवतील.

या अभियानात गावातील प्रतिनिधींना त्यांच्या शाळा सुधारण्यासाठी पूर्ण प्राधान्य राहील. प्रत्येक जिल्ह्याचा विशेष काम करण्याचा भर असतो. आपल्या जिल्ह्यामध्ये प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावणे हेच विशेष काम यापुढे राहील. या अंतर्गत राज्य शासनाकडून अधिकचा निधी आणण्यासाठी प्रयत्न करू. जिल्ह्यातील शाळांचा पुढील चार वर्षात उत्तमपणे दर्जा सुधारला तर फार मोठे यश आपल्या जिल्ह्याला मिळेल. पालकमंत्री म्हणून मी या उपक्रमासाठी सर्वार्थाने लक्ष घालेन अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

खासदार संजय पाटील म्हणाले, जिल्ह्यामध्ये शिक्षणाच्या सक्षमीकरणासाठी माझी शाळा- आदर्श शाळा उपक्रम राबविण्यात येणार असून हा उपक्रम शिक्षणाचा पाया मजबूत करणारा आहे. यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढून त्यांना पुढील शिक्षणासाठी याचा लाभ होईल. माझी शाळा -आदर्श शाळा उपक्रम एक आदर्श मॉडेल ठरेल. या उपक्रमांतर्गत विशेषत: ग्रामीण भागातील शिक्षण दर्जेदार होईल. या चांगल्या उपक्रमासाठी आमचे पूर्ण सहकार्य राहील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, जिल्हा परिषदेने चांगले शिक्षण व आरोग्य यावर भर दिला आहे. कोविड काळामध्ये जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा, ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे सक्षम करण्यात आली आहेत. आता कोरोना ओसरत असून जिल्ह्यात प्राधान्याने प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी भर देण्यात आला आहे. माझी शाळा - आदर्श शाळा उपक्रमांतर्गत 141 शाळांची निवड झाली असून या शाळांना विविध प्रकारच्या सुविधा देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी देण्यात येणार आहे. यासाठीच्या लागणाऱ्या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. या उपक्रमांतर्गत भौतिक सुविधा, प्रशिक्षण, गुणवत्तेवर भर दिला जाणार आहे. शिक्षकांकडून प्राप्त होणाऱ्या चांगल्या सुचनांचा यामध्ये आंतरभाव करून अंमलबजावणी करण्यात येणार आहे, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, या उपक्रमासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींचे सहकार्य अत्यंत आवश्यक आहे. यामुळे गावातील प्राथमिक शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी मदत होईल. आपल्या गावातील शाळा सुधारण्यासाठी या अभियानास सहकार्य करावे. तसेच या अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या सर्व उपक्रमांचे त्रयस्त यंत्रणेकडून ऑडिट करण्यात येणार आहे. त्यामुळे या अभियानाचे काम पारदर्शी चालेल. तसेच पुढील काळात एक शाळा एक अधिकारी या प्रमाणेही संकल्पना राबविण्यात येईल. जिल्ह्यामध्ये राबविण्यात येणारा हा प्रकल्प चांगल्या पध्दतीने यशस्वी झाल्यास तो राज्यासाठी एक पथदर्शी प्रकल्प ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, आमदार अरूण लाड, शिक्षण सभापती आशा पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी माझी शाळा - आदर्श शाळा उपक्रमाचे परिपूर्ण सादरीकरण केले. तसेच हा उपक्रम कशा पध्दतीने राबविण्यात येईल याची सविस्तर माहिती विशद केली.

यावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते स्मार्ट ग्राम, आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार वितरण करण्यात आले. यामध्ये सन 2018-19 अंतर्गत तालुकास्तरावर शिराळा तालुक्यातील वाडीभागाई, वाळवा तालुक्यातील कुरळप, कवठेमहांकाळ तालुक्यातील कुकटोळी, तासगाव तालुक्यातील सावर्डे, खानापूर तालुक्यातील रेणावी, कडेगाव तालुक्यातील शिरसगाव, मिरज तालुक्यातील सावळवाडी, आटपाडी तालुक्यातील तळवडे, पलूस तालुक्यातील रामानंदनगर, जत तालुक्यातील येळदरी तसेच जिल्हा स्मार्ट ग्राम योजनेंतर्गत मिरज तालुक्यातील सावळवाडी. सन 2019-20 अंतर्गत तालुकास्तरावर तासगाव तालुक्यातील अंजनी, वाळवा तालुक्यातील केदारवाडी, कवठेमहांकाळ तालुक्यातील शिंदेवाडी, पलूस तालुक्यातील दुधोंडी, मिरज तालुक्यातील हरीपूर, कडेगाव तालुक्यातील शिरगाव, आटपाडी तालुक्यातील औंटेवाडी, जत तालुक्यातील देवनाळ, शिराळा तालुक्यातील कोकरूड, खानापूर तालुक्यातील पोसेवाडी तसेच जिल्हा सुंदर गाव योजनेंतर्गत तासगाव तालुक्यातील अंजनी गावाचा या ग्रामपंचायतींना प्रशस्तीपत्र, रोप आणि धनादेश देवून गौरविण्यात आले.

Web Title: To raise the standard of education in rural areas - Jayant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.