ईडीच्या दबावामुळे राज ठाकरेंचे महागाईवर मौन - जयंत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2022 12:30 PM2022-05-02T12:30:34+5:302022-05-02T12:31:52+5:30
त्यांच्या भाषणाची सुरुवातच राष्ट्रवादीपासून सुरु होते. राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्यावर बोलल्याशिवाय राज ठाकरे यांना कव्हरेज मिळणार नाही, म्हणून ते टीका करतात. मात्र राज ठाकरे यांच्या कोणत्याही विधानाला महाराष्ट्रातील लोक किंमत देत नाहीत.
सांगली : ईडी (सक्तवसुली संचनालय), आयकर यांच्या दबावामुळे राज ठाकरे महागाईवर, केंद्र सरकारवर काहीही बोलत नाहीत. त्यांनी काय बोलायचे याची स्क्रीप्ट भाजपकडून दिली जाते, अशी टीका जलसंपदा मंत्री, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काल, रविवारी पत्रकारांशी बोलताना केली.
ते म्हणाले की, देशातील परिस्थितीवर बोलताना महागाईवर बोलले पाहिजे. पेट्रोलचे दर सव्वाशेपर्यंत गेले, स्टील, गॅस व अन्य जीवनावश्यक वस्तू महागल्या. या महागाईला केंद्र सरकार जबाबदार आहे. तरीही राज ठाकरे याविषयी ‘ब्र’सुद्धा काढत नाहीत. त्यांच्यावर ईडी किंवा आयकर विभागाचा दबाव आहे. भाजपशी त्यांची युती झालेली नाही, काही चर्चासुद्धा झालेली नाही. तरीही ते भाजपला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या बोलत आहेत.
त्यांच्या भाषणाची सुरुवातच राष्ट्रवादीपासून सुरु होते. राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्यावर बोलल्याशिवाय राज ठाकरे यांना कव्हरेज मिळणार नाही, म्हणून ते टीका करतात. उद्या जर काँग्रेस किंवा अन्य पक्षावर राज ठाकरे बोलले तर लोक त्यांना फार महत्व देणार नाहीत. म्हणून ते फक्त शरद पवार यांच्यावर टीका करतात. मात्र राज ठाकरे यांच्या कोणत्याही विधानाला महाराष्ट्रातील लोक किंमत देत नाहीत.
राज ठाकरे म्हणजे करमणुकीचे साधन आहेत. लोक दोन ते तीन तास त्यांना ऐकतात मनोरंजन समजून सोडून देतात. त्यांना हिंदुच्या विकासाशी काहीही देणे-घेणे नाही. ते फक्त मतांचे राजकारण करु पहात आहेत. लोक त्यांना थारा देणार नाहीत.
राज ठाकरे व ओवेसी यांचा डाव
एकीकडे मुस्लिम समाजाविरोधात व हिंदुच्या बाजुंनी राज ठाकरे यांनी बोलायचे आणि त्याला विरोध म्हणून एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांनी मुस्लिमांची बाजू मांडायची असे ठरलेले आहे. धार्मिक मतांच्या ध्रुवीकरणाचा हा डाव आहे. लोकांनी तो ओळखला आहे. त्यामुळे यांनी कितीही सभा घेतल्या तरी लोक त्यांची दखल घेणार नाहीत, अशी टीकाही जयंत पाटील यांनी केली.