पोलिसांच्या दडपशाहीला आव्हान देत राजू शेट्टी उतरले मैदानात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:28 AM2021-03-09T04:28:46+5:302021-03-09T04:28:46+5:30
इस्लामपूर : एकरकमी एफआरपी मिळावी, या मागणीसाठी पालकमंत्री जयंत पाटील यांच्या राजारामबापू कारखाना कार्यस्थळावरील बापूंच्या पुतळ्याला अभिषेक घालण्याचे ...
इस्लामपूर : एकरकमी एफआरपी मिळावी, या मागणीसाठी पालकमंत्री जयंत पाटील यांच्या राजारामबापू कारखाना कार्यस्थळावरील बापूंच्या पुतळ्याला अभिषेक घालण्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सोमवारी होणारे आंदोलन पोलिसांनी दडपण्याचा प्रयत्न केल्यानंतर, माजी खा. राजू शेट्टी यांनी स्वत: मैदानात उडी घेतली. बापूंच्या पुतळ्यासमोर ३०-४० कार्यकर्त्यांसोबत ठाण मांडत पोलिसांच्या दडपशाहीला प्रत्युत्तर दिले. सोमवारी पहाटेपासूनच जिल्हाभरात एकाचवेळी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली होती.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी राजारामबापू पाटील यांच्या पुतळा परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त लावला होता. स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, संजय बेले, वाळवा तालुका अध्यक्ष भगवत जाधव, प्रभाकर पाटील, रमेश पाटील, तानाजी साठे, संतोष शेळके, जगन्नाथ भोसले या पदाधिकाऱ्यांसह इतर कार्यकर्त्यांना इस्लामपूर, कासेगाव, पलूस आणि सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात स्थानबद्ध करून ठेवले होते. त्यामुळे बापूंच्या पुतळ्यासमोरील आंदोलन दडपल्याची भावना स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली होती.
पोलिसांच्या या दडपशाहीची माहिती मिळताच स्वाभिमानीचे संस्थापक माजी खा. राजू शेट्टी यांनी दुपारी एकच्या सुमारास कार्यकर्त्यांसोबत थेट राजारामबापू कारखान्यावरील पुतळा परिसरात ठाण मांडले. यावेळी त्यांनी, हे आंदोलन शांततेच्या आणि सनदशीर मार्गाने होणार होते. त्यामुळे पोलिसांनी कुणाच्या सांगण्यावरून जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना डांबून ठेवले? कार्यकर्त्यांना बदनाम करण्याचे हे षड्यंत्र आहे. त्यामुळे मला या ठिकाणी यावे लागले. यापुढे पोलिसांची ही दडपशाही खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा दिला.
यावेळी अॅड. एस. यू. संदे, अप्पासाहेब पाटील, संदीप राजोबा, दिग्विजय पाटील, धन्यकुमार पाटील, बापूसाहेब मोरे, राजाभाऊ दुकाने, रामभाऊ पाटील, विक्रांत कबुरे, बाबा चांदरे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.