अण्णा खोत ।मालगाव : मिरज तालुक्यात मलनि:सारणाच्या सुविधेअभावी निर्मलग्राम झालेल्या गावांची वाटचाल पुन्हा हागणदारीकडे होऊ लागली आहे. शौचालयांच्या सिमेंटच्या टाक्या व शोषखड्यात साचलेल्या मलनि:सारणाची ग्रामीण भागात सोय नसल्याने ही परिस्थिती निर्माण होत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी तालुका व जिल्हा प्रशासनाला उपाययोजनेसाठी तातडीने पाऊल उचलावे लागणार आहे.
शासनाने ग्रामीण भागातील गावे हागणदारीमुक्त करण्यासाठी निर्मलग्राम, स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालय बांधकामासाठी प्रोत्साहनपर अनुदान देऊ केले. याचा ग्रामीण भागात परिणाम दिसून आला. २०१३-१४ पर्यंत निर्मलग्राम व २०१४ नंतर स्वच्छता अभियानांतर्गत, शौचालय बांधकाम ही योजना राबविण्यात आली.
या मोहिमेमुळे घरोघरी शोषखड्डे व टाक्यांच्या माध्यमातून वापरासाठी शौचालये उभारली गेली. शौचालयांचा वापर होऊ लागल्याने उघड्यावर शौचास बसणाºयांची संख्या घटली. परिणामी हागणदारी हद्दपार होऊन गावे स्वच्छ झाली. तालुक्यात निकषाप्रमाणे प्रोत्साहनपर अनुदानाच्या माध्यमातून नव्वद टक्के गावे हागणदारीमुक्त झाली. उर्वरित दहा टक्के मोहीम पूर्ण करण्यावर तालुका प्रशासनाचा भर आहे. त्यामध्ये यश येईलही. प्रश्न तो नाही. मात्र शौचालये बांधली, त्यांचा वापर सुरु झाला खरा, पण मलनि:सारणाची सोय नसल्याने, वापरास अयोग्य ठरु पाहणारी शौचालये बंद करून, पुन्हा उघड्यावर शौचास जाण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. सिमेंट टाक्या व शोषखड्ड्यातील साचलेले मल काढायचे कसे? हा त्यांच्यासमोरचा प्रश्न आहे. कवठेपिरानसारख्या गावाचा अपवाद वगळला, तर कोणत्याच ग्रामपंचायतीकडे ही सुविधा नाही.
शहरालगतच्या गावांना महापालिकेच्या मलनि:सारण यंत्रणेवर अवलंबून राहावे लागते. मल साचल्याने अनेक कुटुंबांनी दुर्गंधीमुळे व वापरास अयोग्य ठरू पाहणारी शौचालये वापरण्याचे टाळले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासनाला याची दखल घ्यावी लागणार आहे. तालुक्यात मलनि:सारणाची यंत्रणा तातडीने उभी करावी लागेल. अन्यथा निर्मलग्राम गावे केवळ यंत्रणेअभावी हागणदारीयुक्त झालेली पाहावी लागतील.उपाययोजना करा : विक्रम पाटीलमिरज तालुक्यात ग्रामीण जनतेला भेडसावणाºया मलनि:सारणाच्या समस्येकडे मिरज पंचायत समितीचे सदस्य विक्रम पाटील यांनी गटविकास अधिकाºयांचे लक्ष वेधले. महापालिकेप्रमाणे ग्रामीण भागातही शौचालयांच्या मलनि:सारणाच्या सुविधेची गरज आहे. तालुक्यात पूर्व, पश्चिम असे दोन भाग येतात. दोन्ही भागात ही यंत्रणा आवश्यक आहे. शासनाचा निधी थेट ग्रामपंचायतींना वर्ग होत आहे. लोकसंख्येने मोठ्या असलेल्या गावांना विविध योजनांच्या निधीअंतर्गत ही यंत्रणा राबविण्यासाठी प्रशासनाने प्रस्ताव घेऊन शासनाकडून तातडीच्या परवानगीसाठी पाठपुरावा करण्याची मागणी मिरज पंचायत समितीचे सदस्य विक्रम पाटील यांनी केली आहे.गटविकास अधिकाºयांकडून दखलमिरज तालुक्यातील शौचालयांच्या मलनि:सारण समस्येची गटविकास अधिकारी राहुल रोकडे यांनी दखल घेतली आहे. पूर्व व पश्चिम भागात मलनि:सारणाची समस्या सोडविण्यासाठी दोन्ही भागात सक्षम ग्रामपंचायतीकडून मलनि:सारणाची सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रस्ताव मागवून त्यांचा शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन गटविकास अधिकारी रोकडे यांनी दिले आहे.