‘ई-पास’साठी कारणे दोनच; रुग्णालय आणि अंत्यसंस्कार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:42 AM2021-05-05T04:42:23+5:302021-05-05T04:42:23+5:30
सांगली : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सध्या ‘ई-पास’ असल्याशिवाय परजिल्ह्यात प्रवेश दिला जात नाही. शासनाने लागू करण्यात आलेले निर्बंध आणि ...
सांगली : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सध्या ‘ई-पास’ असल्याशिवाय परजिल्ह्यात प्रवेश दिला जात नाही. शासनाने लागू करण्यात आलेले निर्बंध आणि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने या उपाययोजना केल्या असल्या तरी ‘ई-पास’साठी अर्ज करणाऱ्यांत वैद्यकीय, अंत्यसस्कार या दोन कारणांसाठीच सर्वाधिक अर्ज येत आहेत. प्रक्रिया सुरू केल्यापासून आतापर्यंत ‘ई-पास’साठी ११ हजार ३०९ जणांनी अर्ज केले आहेत.
गेल्या आठवड्यात शासनाने लागू केलेले कडक निर्बंध अधिक कडक करताना, अत्यावश्यक कारणांसाठीच जिल्हाअंतर्गत प्रवासाला परवानगी दिली आहे. तरीही प्रवास करण्याची आवश्यकता भासल्यास त्यासाठी ‘ई-पास’ आवश्यक आहे. गेल्यावर्षी कोरोना संसर्गावेळी हा परवाना देण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे होती. आता ही पोलीस प्रशासनाकडे सोपविण्यात आली आहे.
‘ई-पास’साठी दाखल झालेल्या एकूण अर्जात सर्वाधिक अर्ज हे वैद्यकीय कारणासाठीचे आहेत तर त्यानंतर अंत्यसंस्कारासाठी अर्ज आले आहेत. याशिवाय विवाह समारंभात उपस्थितीसाठीही अर्ज येत आहेत. याशिवाय इतर अनावश्यक कारणांसाठी केलेले अर्ज रद्दबातल ठरविण्यात येत आहेत. याशिवाय अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे अपूर्ण असल्यानेही अनेक अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत.
नागरिकांनीही ‘ई-पास’ची सुविधा घेताना ती अत्यावश्यक कारणांसाठीच वापरावी. अनावश्यक कारणांसाठी जिल्हाअंतर्गत प्रवास टाळावा असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
चौकट
‘ई-पास’ला लगेच मंजुरी
अत्यावश्यक कारणांसाठी पाससाठी अर्ज केल्यानंतर दिवसभरात मंजुरी देण्यात येत आहे. तर कधी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास दोन दिवसांत मंजुरी मिळत आहे. मात्र, परिपूर्ण माहिती व आवश्यक कागदपत्रे असलेले अर्ज त्वरित मंजूर करण्यात येत आहेत.
चौकट
ही कागदपत्रे हवीत
* वैद्यकीयसह इतर कारणांसाठी जिल्हाअंतर्गत प्रवासाची वेळ आल्यास ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येतो. यात अर्ज करणाऱ्या व्यक्तीच्या कोणत्याही एका ओळखपत्राची आवश्यकता आहे.
* अर्ज भरताना त्यासोबत वैद्यकीय प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. त्यात कोविड अहवाल निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
* ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा असल्याने नागरिकांची पायपीट वाचत आहे. मात्र, अर्ज दाखल करताना त्यासोबत ओळखपत्र व वैद्यकीय प्रमाणपत्राची आवश्यकता आहे.
चौकट
‘ई-पास’साठी अर्ज दाखल करण्यासाठी पोलीस प्रशासनाने संकेतस्थळाची सोय केली आहे. त्यानुसार ‘कोविड १९ डॉट एमएचपोलीस डॉट इन’ यावर जाऊन ऑनलाइन पद्धतीनुसार अर्ज दाखल करावा लागणार आहे.
चौकट
त्याच त्या कारणांचा समावेश
आतापर्यंत दाखल करण्यात आलेल्या ११ हजारांवर अर्जांचा विचार करता यातील ९० टक्क्यांहून अधिक अर्ज हे वैद्यकीय कारणांसाठीच करण्यात आले आहेत. कोरोनामुळे निर्माण झालेली स्थिती बघता, वैद्यकीय कारणांसाठी केलेला अर्ज तात्काळ मंजूरही करण्यात येत आहे. मात्र, त्याच त्या कारणांमुळे मंजुरीसही अडचणी येत आहेत.
चौकट
आतापर्यंत किती अर्ज आले ११३०९
आतापर्यंत मंजूर अर्ज ७३००
नामंजूर अर्ज ४००९