महापालिका क्षेत्रात मागील दोन वर्षांत महापूर आणि कोरोनामुळे घरपट्टी विभागाची थकबाकी ९० कोटींवर पोहोचली आहे. ही थकबाकी वसुलीसाठी दंड व शास्तीत माफी देण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला होता. त्याला महासभेनेही मान्यता दिली होती. ३१ मार्चपर्यंत थकबाकी भरणाऱ्या मालमत्ताधारकांसाठी ही योजना लागू करण्यात आली आहे. कर निर्धारक व संकलक नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली खास पथकेही तयार करण्यात आली आहे. टाॅप शंभर थकबाकीदारांची यादी तयार करून त्यांच्या दारापर्यंत घरपट्टी विभागाचे कर्मचारी जात आहेत. तसेच सहायक आयुक्तांचीही वसुली कामात मदत करण्यासाठी नियुक्ती केली आहे.
गेल्या १८ दिवसांत या योजनेतून ५ हजार ३२७ मालमत्ताधारकांनी योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांच्याकडून ३ कोटी रुपयांची थकबाकी वसूल झाली आहे. अभय योजनेला ३१ मार्चनंतर मुदतवाढ मिळणार नाही. त्यामुळे थकीत मालमत्ताधारकांनी तातडीने कराचा भरणा करून अभय योजेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे.