सांगली : केंद्र शासनाच्या आयकर विभागात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहभागी तसेच प्राविण्यधारक खेळाडूकरीता विविध पदासाठी खेळाडू भरती होणार आहे. यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धा, शालेय राष्ट्रीय स्पर्धा सहभागी व प्राविण्यप्राप्त खेळाडूंकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी सांगली जिल्ह्यातील राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा खेळलेल्या पात्र खेळाडूंनी कामगिरी प्रमाणित करण्यासाठीचे अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे यांनी केले आहे.यासाठी खेळाडूंनी त्यांनी मिळविलेल्या क्रीडा प्राविण्याची प्रमाणपत्रे संबंधित प्राधिकरणाकडून प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे. राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत सहभागी खेळाडूंनी आपली प्रमाणपत्रे आयुक्त क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून प्रमाणित करून घ्यावयाची आहेत.
सद्यपरिस्थितीत कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भावाचा विचार करता राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंनी व्यक्तीश: पुणे येथे उपस्थित राहणे धोक्याचे असल्याने आयकर भरतीसाठी इच्छुक असलेल्या पात्र खेळाडूंची कामगिरी प्रमाणित करून घेण्यासाठीचे अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात स्वीकारून क्रीडा व युवक सेवा संचालनालयास सादर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार सांगली जिल्ह्यातील पात्र खेळाडूंचे अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे स्विकारून क्रीडा व युवक सेवा संचालनालयात सादर करण्यात येणार आहेत.सांगली जिल्ह्यातील राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा खेळलेल्या पात्र खेळाडूंनी कामगिरी प्रमाणित करण्यासाठीचे अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, साई फिटनेस सेंटर, नविन इमारत, मालू हायस्कूल समोर, गुलमोहर कॉलनी, दक्षिण शिवाजीनगर, सांगली येथे सादर करावेत, असे आवाहनही वाघमारे यांनी केले आहे.