अॅपेक्समध्ये रेमडेसिविरचा काळाबाजार उघडकीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:32 AM2021-07-14T04:32:11+5:302021-07-14T04:32:11+5:30
मिरजेतील अॅपेक्स रुग्णालयात ८७ रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी रुग्णालय चालक डाॅ. महेश जाधव याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल ...
मिरजेतील अॅपेक्स रुग्णालयात ८७ रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी रुग्णालय चालक डाॅ. महेश जाधव याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी यापूर्वी डाॅ. जाधव बंधूसह १३ जणांना अटक केली आहे. ॲपेक्स रुग्णालयातील कर्मचारी अमीर खान याने रेमडेसिविर इंजेक्शनची काळ्या बाजारात विक्री केल्याची माहिती मिळाल्याने त्यास अटक करण्यात आली. अॅपेक्स रुग्णालयात काम करणाऱ्या अमीर खान याने रुग्णालयील डॉ. महेश जाधव याच्या जवळच्या अन्य कर्मचाऱ्यांशी संगनमत करून मोठ्या प्रमाणात रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार केला. रुग्णांना रेमडेसिविर न देताच ते दिल्याचे भासवून रुग्णालयातून बाहेर काढून इतर रुग्णांच्या नातेवाईकांना भरमसाठ रक्कम घेऊन विकल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास अटक करण्यात आली. अॅपेक्समधून रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार झाल्याचेही उघडकीस आल्याने याप्रकरणी पोलिसांनी आणखी काहीजणांची चाैकशी सुरू केली आहे. कोविड रुग्णांच्या मृत्यूसोबत रेमडेसिविर इंजेक्शनच्या काळाबाजार प्रकरणीही एकास अटक झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. अॅपेक्समध्ये गैरप्रकारात सहभागी झाल्याबद्दल अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर डाॅ. शेलेश बरफे याच्यासह दोघे रुग्णालय कर्मचारी अद्याप फरारी असल्याचे पोलिसांनी सांगितले.