सांगली : सध्या महाराष्ट्रातील कोरोनाच्या परिस्थितीची केंद्र शासनाला माहिती आहे. तरीही रेमडेसिविर, ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात केंद्र शासनाकडून दुजाभाव केला जात आहे. केंद्र शासनाने राज्याकडे माणुसकीच्या नात्यातून पाहावे, असे मत राज्याचे कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी शुक्रवारी येथे पत्रकार बैठकीत व्यक्त केले.
कदम म्हणाले की, महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. ऑक्सिजन व रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी वाढत आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्राने ऑक्सिजन व रेमडेसिविरची मागणी केंद्राकडे केली होती. ही मागणी रास्त असताना केंद्राने रेमडेसिविर पुरवठ्यात घट केली असून केवळ २६ हजार रेमडेसिविर राज्याला दिली जात आहेत. असा दुजाभाव केंद्राने करू नये. देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे. येथे असा प्रकार चुकीचा आहे.
राज्य शासनाकडून ऑक्सिजन व रेमडेसिविर उपलब्ध करण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. रेमडेसिविरचा वापरही डाॅक्टरांनी रुग्णांची स्थिती पाहूनच केला पाहिजे. हे औषध अंतिम पर्याय नाही. कोरोना लसीच्या किमती वाढविण्यात आल्या आहेत. राज्य सरकारला चारशेला, तर खासगी रुग्णालयांमध्ये सहाशे रुपयांना लस मिळणार आहे. याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची सीरम इन्स्टिट्यूटशी चर्चा सुरू आहे. मीदेखील ‘सीरम’च्या अदर पुनावाला यांच्याशी बोललो आहे. लवकरच सकारात्मक मार्ग निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
चौकट
सांगली व पुण्यात उभारणार ऑक्सिजन प्लांट
राज्यात ऑक्सिजनची कमतरता सध्या तरी भासत नाही. मात्र रुग्णसंख्येत वाढ झाल्यानंतर ऑक्सिजनचा तुटवडा भासू शकते. त्यामुळे सांगली व पुण्यात भारती रुग्णालयाच्यावतीने ऑक्सिजन प्लांट बसविण्यात येणार आहे. यातून भारती रुग्णालयासह इतर रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा केला जाईल. तीन आठवड्यात हे काम होईल, असेही कदम म्हणाले.