लाेकमत न्यूज नेटवर्क
सांगली : राज्यातील वाढते जातीय अन्याय, अत्याचार, ॲट्रॉसिटी केसेसचे वाढते प्रमाण यासह विविध प्रश्नांवर शासनाच्या उदासीनतेविरुद्ध रिपब्लिकन स्टुडंट युनियनच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डरकाळी आंदोलन करण्यात आले.
संघटनेचे प्रमुख अमोल वेटम यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, विशेष सरकारी वकिलांच्या रखडलेल्या नियुक्त्या, पोलीस व राज्य सरकारचे दुर्लक्ष, सामाजिक न्याय विभाग, समाजकल्याणचा भोंगळ कारभार, विद्यार्थी व समाजाचा निधी परत जाण्याचे प्रकार, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सवलतींवर घाला, मागासवर्गीय पदोन्नती आरक्षण, ओबीसी राजकीय आरक्षण, मुस्लीम आरक्षण, आदी अनेक प्रश्न सध्या निर्माण झाले आहेत. त्यामुळे या प्रश्नांवर सरकारने तातडीने पावले उचलावीत, अन्यथा राज्यभर आंदोलन करण्यात येतील.
आंदोलनात अमोल वेटम, उपाध्यक्ष सचिन कांबळे, भूपेंद्र कांबळे, अमित वेटम, पोपट बनसोडे, शंकर माने, लहरीदास कांबळे, प्रा. शिवाजी त्रिमुखे, अमित शिंदे, दिलीप कांबळे आदी सहभागी झाले होते.