इस्लामपूर औद्योगिक वसाहतीमध्ये रात्रंदिवस ऑक्सिजन प्लांट सुरू आहे.
अशोक पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : गेले तीस वर्षांहून अधिक काळ शहर आणि परिसरातील रुग्णालयाला ऑक्सिजन पुरविण्यासाठी सदैव तत्पर असलेल्या श्री ट्रेडर्स लिक्विड ऑक्सिजनचे अमर थोरात यांनी कोरोनाच्या महामारीतही रात्रंदिवस आपला प्लांट चालवून ऑक्सिजन सिलिंडर पुरवण्याचे काम यशस्वीरीत्या पाडत आहेत. या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांना संजीवनी मिळत आहे.
अमर थोरात यांचा व्यवसाय शेती आहे; परंतु जोड म्हणून इस्लामपूर येथे त्यांनी छोटेखानी ऑक्सिजनचे सिलिंडर विक्री करण्याचा व्यवसाय सुुरू केला. कराड, कोल्हापूर येथून ते सिलिंडर विक्रीसाठी आणत होते. इस्लामपूर आणि शिराळ्यातील रुग्णालयांना ऑक्सिजन सिलिंडर पुरविण्याची सेवा सातत्याने केली. २०२० मध्ये कोरोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला. याचाच सारासार विचार करून थोरात यांनी इस्लामपूर औद्योगिक वसाहतीत तेरा टन क्षमतेचा लिक्विड टॅँक उभा करून ऑक्सिजनची निर्मिती केली. पहिल्या कोरोनाच्या लाटेत त्यांना सात ते आठ टन लिक्विड लागत होते. आता ते रुग्णालयांना डुरा सिलिंडर भरून देत आहेत.
सांगली शहरासह सर्व तालुक्यातील रुग्णालयांसाठी दोन दिवसांआड पोलीस संरक्षणात पाच टनांपासून ते दहा टनांपर्यंत लिक्विड उपलब्ध होत आहे. त्यामुळे सर्वच रुग्णालयाला ऑक्सिजन वेळेत पुुरविण्यासाठी सध्या दोन पाळ्यांमध्ये कर्मचारी कार्यरत आहेत. या त्यांच्या सेवेमुळे इस्लामपूर व परिसरात ऑक्सिजनची कमतरता भासत नाही; परंतु ऑक्सिजनचे बेड मात्र कमी पडू लागले आहेत.
चौकट
आईच्या मृत्यूनंतरही प्लांट सुरूच
सहा एप्रिल रोजी त्यांच्या मातोश्री हेमलता भाऊसाहेब थोरात (८५) यांचे वृद्धापकाळाने निधन होऊनही थोरात यांनी आपला प्लांट बंद ठेवला नाही. कोरोना रुग्णांना वेळेत ऑक्सिजन मिळावा म्हणून त्यांची अहोरात्र धडपड म्हणजे कोरोना रुग्णांना जीवनदायी ठरत आहे.