समृध्द वारसा.. विशाल जनसंपर्क... : अमित ऊर्फ विशाल(दादा) पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:27 AM2021-04-09T04:27:52+5:302021-04-09T04:27:52+5:30
क्रांतिकारकांचा तालुका अशी ओळख असलेल्या तासगाव तालुक्यात तासगाव पंचायत समितीचे पहिले सभापती होण्याचा मान येळावीच्या बाबासाहेबदादा पाटील यांना मिळाला ...
क्रांतिकारकांचा तालुका अशी ओळख असलेल्या तासगाव तालुक्यात तासगाव पंचायत समितीचे पहिले सभापती होण्याचा मान येळावीच्या बाबासाहेबदादा पाटील यांना मिळाला होता. त्यानंतर १९६७ ते १९७७ या कालावधीत बाबासाहेबदादांनी तासगाव तालुक्याचे आमदारपद भूषविले. त्यांचे सुपुत्र विजयअण्णा पाटील १९९२ मध्ये जिल्हा परिषद सदस्य झाले. २००५ मध्ये पंचायत समितीचे सभापती झाले. या दोन्ही नेत्यांनी समाजाला प्रथमप्राधान्य देत विकास कामांचा झंझावात निर्माण केला. अशा समाजाभिमुख नेतृत्व असणाऱ्या बाबासाहेबदादांचे नातू आणि विजयअण्णांचे चिरंजीव अमित ऊर्फ विशालदादांनीदेखील तोच वारसा पुढे कायम ठेवण्याची कामगिरी केली.
अतिशय तरुण वयात अमित पाटील यांची २००४ मध्ये येळावी ग्रामपंचायत सदस्य म्हणून एंट्री झाली. गावात कामाचा ठसा उमटवल्यानंतर २००७ मध्ये पंचायत समिती सदस्य म्हणून विजयी झाले. पंचायत समितीत आल्यानंतर अभ्यासू वृत्तीने अनेक शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी, सामान्य जनतेपर्यंत शासनाच्या योजना पोहोचवण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी केली. केवळ राजकीय वारसाच नव्हे, तर स्वत:च्या कर्तृत्वाने सामाजिक, विधायक आणि विकासात्मक राजकारणाचा वारसा जोपासण्याचे काम अमितदादांनी केले. स्वत:च्या कर्तृत्वाचा ठसा उमटवून अमितदादांनी जनतेच्या मनात स्वत:चे एक वेगळे वलय निर्माण केले. त्यातूनच तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यात कामांतून एक वेगळे वलय निर्माण झाले.
२०११ मध्ये वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून अमितदादांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर पुन्हा २०१६ मध्ये कारखान्याचे संचालक म्हणून निवड झाली. साखर कारखान्यावर संचालक म्हणून गेल्यानंतर २०११ पासून जोरदारपणे कारखान्याच्या माध्यमातून शेतकरी हिताला प्राधान्य देत शेतकर्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा सुरू केला. त्यामुळे तासगाव, कवठेमहांकाळ, मिरज आणि पलूस तालुक्यात दांडगा जनसंपर्क तयार झाला. पूर्णवेळ जनतेच्या कामासाठी वाहून घेतलेल्या अमितदादांनी स्वत:च्या कामाच्या शैलीतून लोकांची मने तर जिंकलीच, शिवाय सर्वसामान्यांच्या अडीअडचणींत धावून जाण्याच्या स्वभावामुळे लोकांनाही हक्काचा नेता मिळाला.
आश्वासक आणि कर्तृत्वमय नेतृत्वामुळे अमितदादांनी तासगाव, कवठेमहांकाळ, मिरज, पलूस तालुक्यातील जनतेच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. तळागाळापर्यंत जनसंपर्क ठेवून पूर्णवेळ समाजकार्यासाठी वाहून घेतलेल्या अमितदादांना भावी राजकीय, सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा! जनतेच्या मनातील नेतृत्वाच्या यशाचा आलेख उंचावत राहो, हीच यानिमित्ताने सदिच्छा!
चौकट :
सर्वसामान्यांचे नेतृत्व :
तासगाव तालुक्यातील संधी साधून राजकारणाचा पॅटर्न अनेकदा दिसून आला. याच पॅटर्नमधून तालुक्यात एकेकाळी आबा-काका ऐक्य एक्स्प्रेस धावली. त्यावेळी आबा आणि काका या दोन नेत्यांनी एकत्रित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक लढवली होती. त्यांच्याविरोधात २००७ मध्ये अमितदादांनी येळावी गणातून पंचायत समिती निवडणूक लढविली आणि विजय मिळविला. त्याचवेळी सर्वसामान्यांच्या कर्तृत्ववान नेतृत्वाची मोहोर अमितदादांच्या नेतृत्वावर उमटली.