वांगीत नदीपात्रात जाणारे रस्तेच केले बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:19 AM2021-06-17T04:19:03+5:302021-06-17T04:19:03+5:30
कडेगाव : कडेगाव तालुक्यातील वांगी येथील येरळा नदीच्या पात्रातून बेकायदेशीररित्या होणाऱ्या वाळू तस्करीवर तहसीलदार डॉ. शैलजा पाटील यांनी धडक ...
कडेगाव : कडेगाव तालुक्यातील वांगी येथील येरळा नदीच्या पात्रातून बेकायदेशीररित्या होणाऱ्या वाळू तस्करीवर तहसीलदार डॉ. शैलजा पाटील यांनी धडक कारवाई केली. येथील दोन ठिकाणी सुमारे १५ ब्रास वाळू जप्त करण्यात आली. नदीपात्रात जाणाऱ्या रस्त्यावर जेसीबीच्या साहाय्याने मोठ मोठ्या चरी काढण्यात आल्या आहेत.
तालुक्यात येरळा व नांदणी या दोन प्रमुख नद्या आहेत. जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात येरळा नदीतील वाळू बांधकामासाठी प्रसिद्ध आहे. त्याचा फायदा उचलत येथील वाळूमाफिया रात्रपाळीस बेकायदेशीररित्या वाळू तस्करी करतात. दरम्यान, अधिकारी काेरोना नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत असताना त्याचा फायदा घेत माफिया येथील नदीतून वाळू तस्करी करताना दिसत आहे. याबाबत महसूल विभागाकडे तक्रारी आल्या होत्या.
वाळू तस्करीला आळा घालण्यासाठी स्वतः तहसीलदार पाटील यांच्यासह महसूल कर्मचाऱ्यांनी थेट नदीपात्रात जाणाऱ्या रस्त्यावर चरी काढत धडक कारवाई केली. वांगी येथे दोन ठिकाणचे वाळू साठे जप्त करून तहसील कार्यालयात जमा करण्यात आले.
फोटो : वांगी (ता. कडेगाव) येथे नदीपात्रात जाणारे रस्ते जेसीबीच्या सहाय्याने बंद करताना कडेगावच्या तहसीलदार डॉ. शैलजा पाटील.