सांगली शहराचा विस्तार वेगाने हाेत असला तरी मुख्य बाजारपेठेसह गावभाग परिसरात अरुंद रस्ते व त्यामानाने अधिक वर्दळ नेहमीच असते. त्यातच आता या भागात सर्वच रस्त्यांवर वाहने लावली जात आहेत. या परिसरात असलेली दोन सार्वजनिक पार्किंग व्यवस्थाही चारचाकी वाहनांनी भरून गेल्याने रस्त्यावरच वाहने लावली जात आहेत. शंभरफुटी रोड, कोल्हापूर रोड, विश्रामबाग परिसरातील काही भागातही दाटीवाटीने रस्त्यावरच वाहने उभी केली जात असल्याने अपघाताच्या घटना घडतच आहेत.
केवळ शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातही काहीशी अशीच स्थिती आहे. जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवर बंद पडलेली व भंगार झालेली वाहने पाहावयास मिळत आहेत. त्यामुळे रस्त्यावरील ही जीवघेणी पार्किंग बंद करून वाहनधारकांना दिलासा देण्याची आवश्यकता आहे.
चौकट
अस्ताव्यस्त पार्किंग करणाऱ्या वाहनांवर कारवाईसाठी वाहतूक शाखेच्यावतीने क्रेन सेवा असली तरी जिथे गरज आहे तिथे कारवाई न करता इतर भागातच वाहने उचलली जात आहेत. महापालिकेच्या अतिक्रमण पथकानेही रस्त्यावर वाहने लावणाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. महापालिकेने मध्यंतरी बंद पडलेली वाहने रस्त्यावर लावणाऱ्या मालकांवर कारवाईचे संकेत दिले होते; मात्र त्यानंतर ही कारवाई बारगळली आहे.
चौकट
शंभरफुटी रस्ता विळख्यात
शहरातील शंभरफुटी रस्त्यावरील वाहनांची वर्दळ कमी करण्यासाठी महापालिकेसह पोलिसांनीही वारंवार मोहीम राबवूनही पुन्हा वाहने रस्त्यावरच येत आहेत. या भागात असलेल्या गॅरेजच्या वाढत्या संख्येमुळे ही अडचण निर्माण होत आहे.