विनापरवाना ड्रेनेज जोडणीसाठी रस्ता उकरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:28 AM2021-04-16T04:28:09+5:302021-04-16T04:28:09+5:30
सांगली : महापालिकेच्या ड्रेनेज विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. या विभागातील एका कर्मचाऱ्याने परस्परच ड्रेनेजची जोडणी केली. त्यासाठी ...
सांगली : महापालिकेच्या ड्रेनेज विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. या विभागातील एका कर्मचाऱ्याने परस्परच ड्रेनेजची जोडणी केली. त्यासाठी महापालिकेची परवानगीही घेतलेली नाही. त्यातच दोन महिन्यांपूर्वी केलेला नवा रस्ताही उकरण्यात आल्याचा आरोप भाजपचे गटनेते विनायक सिंहासने यांनी गुरुवारी केला. हा प्रकार गंभीर असून, आयुक्तांनी संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
सिंहासने म्हणाले की, आमराई ते आझाद चौक या रस्त्याचे दोन महिन्यांपूर्वीच डांबरीकरण करण्यात आले. आता ड्रेनेज जोडण्यासाठी हा रस्ता महापालिकेने उकरला आहे. याबाबत अधिक माहिती घेतली असता ड्रेनेज जोडणीची परवानगीच घेतली नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. ड्रेनेज विभागातील एका कर्मचाऱ्याने परस्परच हा कारभार केला आहे. या कामाची कसलीही फाईल तयार करण्यात आली नाही. हा प्रकार उघड होताच ड्रेनेज विभागाच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. त्यांना जागेवर नेऊन हा प्रकार दाखविला. ड्रेनेज विभागाचे तेजस शहा यांनी ड्रेनेज जोडणीसाठी परवानगी घेतली नसल्याचे कबूल केले आहे.
वास्तविक हा प्रकार गंभीर आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून परस्परच ड्रेनेज वाहिन्या जोडण्याचे काम सुरू आहे की काय? अशी शंका येते. यातून महापालिकेच्या ड्रेनेज कराचे उत्पन्न बुडणार आहे. त्यामुळे आयुक्तांनी या प्रकरणात लक्ष घालून सखोल चौकशी करावी व संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.