कोकरुड : शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील मोबाईल सेवेसह इंटरनेट सुविधा गेल्या दोन महिन्यांपासून वारंवार खंडित होत आहे. या कारणावरुन शेडगेवाडी येथील सर्व व्यापारी आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनस्थळी निवासी नायब तहसीलदार अरुण कोकाटे यांनी भेट देऊन लेखी निवेदन स्वीकारले. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील कोकरुड, शेडगेवाडी, चरण, आरळा या प्रमुख बाजारपेठा आहेत. परिसरात मोठ-मोठे उद्योग, व्यवसाय आहेत. त्यातच हा परिसर पूर्ण डोंगरी असल्याने इंटरनेटची अवस्था फार वाईट आहे. या भागात सर्व कपंन्यांचे मोबाईल टॉवर असतानाही इंटरनेट सेवा सुरळीत चालत नाही. त्याचा फटका व्यापारासह शिक्षण, शासकीय कार्यालये, बँका, पतसंस्था यांच्या कारभारावर होत आहे.
या ठिकाणी राहत असलेले लोक व व्यवसाय करणारे व्यापारी व ग्राहक इंटरनेट सुविधा चालत नसल्यामुळे हैराण झाले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बहुतांश व्यवहार ऑनलाईन सुरू झाले आहेत, पण इंटरनेटची रेंजच नसल्याने व्यापाऱ्यांना आर्थिक व्यवहार, विद्यार्थ्यांना अभ्यास, शासकीय कार्यालयातील कामकाज, बँकांची कार्यप्रणाली पूर्णपणे ठप्प पडत आहे.
याबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रश्न सुटत नाही. याला कंटाळून सोमवारी सकाळी ११ वाजता सर्वपक्षीय कार्यकर्ते, व्यापाऱ्यांनी आंदोलन केले. मनसे तालुकाध्यक्ष संजय पाटील, बाजीराव शेडगे, मनोज चिंचोलकर, दिनकर शेडगे, तानाजी नाठुलकर, विकास शेडगे, अमर सावंत, संजय कोठावळे, बाबा गोळे, श्रीकृष्ण कवर, चंद्रकांत हजारे, तात्या यादव, अजय एटम यांच्यासह व्यापाऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. घटनास्थळी कोकरुड पोलीस ठाण्याचे साहायक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
चाैकट
मनसे स्टाईल आंदोनल करू
पंधरा दिवसांत सर्व मोबाईल कंपन्यांनी आपली सेवा सुरळीत करावी. अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा मनसे तालुकाध्यक्ष संजय पाटील यांनी दिला आहे.
फोटो-११कोकरुड १ व २