लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : ड्रेनेजच्या रेंगाळलेल्या कामामुळे एका पावसातच सांगलीच्या उपनगरांमधील रस्ते चिखलात रुतल्याने वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. त्यामुळे नागरिकांचे हाल सुरू झाले आहेत.
शहरातील पंचशीलनगर, शांतिनिकेतन परिसर, वसंतदादा कारखाना परिसर, लक्ष्मीनगर, शिवोदयनगर आदी भागांतील आठ रस्ते पावसामुळे बंद झाले. या ठिकाणी ड्रेनेजसाठी खड्डे खोदल्याने त्या ठिकाणी आता पावसाने चिखल साचला आहे. वाहनेच नव्हे, तर लोकांनाही या रस्त्यावरुन ये-जा करणे मुश्कील झाले आहे. रविवारी रात्री झालेल्या पावसानंतर लक्ष्मीनगर ते अजिंक्यनगर रस्त्यावर अनेक दुचाकी वाहने घसरून पडली. सहा ते सात लोक किरकोळ जखमी झाले.
सांगलीच्या उपनगरांमध्ये सध्या ड्रेनेजची कामे अत्यंत मंदगतीने सुरू आहेत. त्यामुळे रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे कामही थांबले आहे. अशा स्थितीत एक पाऊस झाला, तरी सर्व रस्ते चिखलात रुतत आहेत. काळ्या मातीच्या जमिनींमध्ये या अडचणी मोठ्या प्रमाणावर येत आहेत.
वसंतदादा कारखाना गेट ते शांतिनिकेतन गेट या रस्त्यावर ड्रेनेजच्या कामासाठी खोदाई केली असून, मंदगतीने हे काम सुरू आहे. त्यामुळे रविवारी पडलेल्या पावसाने हा रस्ता वाहतुकीसाठी अडचणीचा बनला आहे. लक्ष्मीनगरच्या चौकातच एक मोठा खड्डा खोदून तो तसाच ठेवला आहे. शिवोदयनगर परिसरात ड्रेनेजचे काम पूर्ण झाल्यानंतर, मातीचे डोंगर रस्त्यावर उभारले गेले आहेत. त्यामुळे चिखलात हे रस्ते रुतत आहेत.
पावसाळ्यापूर्वी सांगलीतील हे रस्ते पूर्ववत करावेत, अशी मागणी संतप्त नागरिकांतून होत आहे.