ओळी : एस. टी. महामंडळाकडूून पासधारक विद्यार्थ्यांची अडवणूक करू नये, अशी मागणी मदनभाऊ युवा मंचच्या वतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन आगार प्रमुखांना देण्यात आले
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शहर व आजूबाजूच्या खेड्यापाड्यातून दररोज हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी सांगली, आष्टा, इचलकरंजी, कोल्हापूरला ये - जा करत असतात. या पासधारक विद्यार्थ्यांची वाहकाकडून अडवणूक केली जात आहे. बसमध्ये केवळ पाचच विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या गैरसोयींना तोंड द्यावे लागत असून, त्यातून महामंडळाने तोडगा काढावा, अन्यथा उपोषण करण्याचा इशारा मदनभाऊ युवा मंचच्या वतीने देण्यात आला.
युवा मंचचे जिल्हाध्यक्ष आनंद लेंगरे यांनी याबाबतचे निवेदन आगारप्रमुखांना दिले. लेंगरे म्हणाले की, पासधारक विद्यार्थ्यांना एसटीचे वाहक गाडीत घेत नाहीत. केवळ पाचच पासधारकांना बसमध्ये घेण्याचे आदेश असल्याचे सांगितले जाते. पाचपेक्षा अधिक विद्यार्थी असतील तर त्यांना दुसऱ्या बसने येण्याची सूचना केली जाते. मदनभाऊ युवा मंचाकडे विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या बऱ्याच तक्रारी आल्या आहेत. आधीच कोरोनामुळे शैक्षणिक कालावधी कमी झाला आहे. त्यात एस. टी. महामंडळाच्या नियमामुळे त्यांचे नुकसान होत आहे. तरी या प्रश्नावर तातडीने तोडगा काढावा, अन्यथा महामंडळाच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला.