बुधगाव ग्रामपंचायतीच्या २१ कर्मचाऱ्यांमध्ये पाच कर्मचाऱ्यांचा नऊ ते दहा महिन्यांचा पगार थकीत आहे. महिला आरोग्य कर्मचाऱ्यांचा चार, तर इतरांचाही चार ते दहा महिन्यांचा पगार ग्रामपंचायतीने वेळोवेळी मागणी करूनही दिलेला नाही. कोरोनाच्या काळात या सर्वच कर्मचाऱ्यांनी दिवस-रात्र प्रामाणिकपणे काम केले आहे. तरीही आजअखेर त्यांना पगारापासून वंचित ठेवले गेले आहे. या कर्मचाऱ्यांवर आता खऱ्या अर्थाने उपासमारीची वेळ आली आहे. तत्कालीन ग्रामविकास अधिकाऱ्यांसह सरपंचांनीही कर्मचारी पगाराच्या मुद्द्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप आहे. सध्यातर ग्रामपंचायतीत ग्रामविकास अधिकारीच नसल्याने कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रश्नी लक्ष देऊन कर्मचाऱ्यांच्या पगाराची १४ जानेवारीपर्यंत व्यवस्था करावी. अन्यथा १५ तारखेपासून नाइलाजास्तव काम बंद आंदोलन सुरू करू, असा इशाारा या कर्मचाऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
चौकट
ग्रामविकास अधिकाऱ्यांची नेमणूक नाहीच!
मागील १५ डिसेंबर रोजी बुधगाव ग्रामपंचायतीत एक मोठा गैरप्रकार उघडकीस आला. महिनोन् महिने मासिक बैठकीला गैरहजर सदस्याच्या घरी जाऊन सह्या आणल्याचा प्रकार एका सदस्याने उघडकीस आणला. याप्रकरणी ग्रामविकास अधिकारी संजय पाटील यांना १७ डिसेंबरला निलंबित केले गेले. त्यानंतर कामांच्या सोयीसाठी मदन यादव यांना सांगण्यात आले आहे. मात्र, ते आर्थिक व्यवहार पाहत नसल्याने पगाराचा प्रश्न प्रलंबित राहिला आहे.