म्हांडूळ विक्री; दोघांना अटक
By admin | Published: September 26, 2014 10:58 PM2014-09-26T22:58:52+5:302014-09-26T23:29:35+5:30
मिरजेत कारवाई : गुप्त धनासाठी तस्करी
मिरज : गुप्त धनासाठी म्हांडूळ सर्पाची विक्री करणाऱ्या विट्यातील दोघांना पोलिसांनी मिरजेत पकडले. तीन फूट लांबीच्या दुर्मीळ म्हांडूळ सर्पासह दोघांना वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले.
पीपल्स फॉर अॅनिमल्सचे अशोक लकडे व कार्यकर्त्यांना विट्यातील आशिष रावसाहेब पवार (वय २३) व शुभम् रवींद्र चोेथे (१९) हे दोघेजण गुप्तधनासाठी होमहवन करण्यासाठी म्हांडूळ जातीच्या सर्पाची विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. याबाबत पोलिसांना माहिती देऊन या दोघांना सर्प खरेदीच्या बहाण्याने मिरजेत बोलावण्यात आले. म्हांडूळ सर्पाची किंमत आठ लाख रुपये ठरविण्यात आली होती. तीन फूट लांबीचा जिवंत म्हांडूळ सर्प घेऊन पवार व चोथे हे दोघे मिरजेत आल्यानंतर त्यांना पोलीस उपअधीक्षक बजरंग बनसोडे यांच्या पथकाने म्हांडूळ सर्पासह रंगेहात पकडले. पवार व चोथे यांच्याकडून एक लाख रूपये किमतीचा म्हांडूळ जातीचा सर्प व (एमएच १०, ए. एल. ८३२१) या क्रमांकाची मोटारसायकल जप्त करून त्यांना कारवाईसाठी वन विभागाच्या ताब्यात दिले.
ताब्यात घेतलेल्या आशिष रावसाहेब पवार याचे वडील डॉक्टर आहेत. चैनीसाठी त्याने सर्प विक्रीचा व्यवसाय सुरू केल्याची कबुली दिली आहे. पवार व त्याचा साथीदार चोथे यांनी आतापर्यंत अशा दोन सर्पांची विक्री केली आहे.(वार्ताहर)