संभाजी पवार निधन प्रतिक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:26 AM2021-03-16T04:26:52+5:302021-03-16T04:26:52+5:30
---------- संभाजी पवार यांनी सांगलीतील काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडून एक सक्षम विरोधी पक्ष नेता म्हणून महाराष्ट्रात लोकप्रियता मिळवली होती. ...
----------
संभाजी पवार यांनी सांगलीतील काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडून एक सक्षम विरोधी पक्ष नेता म्हणून महाराष्ट्रात लोकप्रियता मिळवली होती. कुस्तीच्या आखाड्याप्रमाणे आमदार झाल्यावर गोरगरीब व सामान्य जनतेची कामे करून राजकारणात लोकप्रियता मिळवली होती. आप्पा भारतीय जनता पक्षात आल्यानंतर सांगली जिल्ह्यातील पक्षाच्या कामाला गती आली. रस्त्यावर उतरून विविध प्रश्नांवर त्यांनी काढलेले मोर्चे, आंदोलने ही जनतेच्या कायम स्मरणात राहतील. - चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष भाजप.
-----------
हमाल, माथाडी, रिक्षाचालक, झोपडपट्टीधारक अशा उपेक्षित व असंघटित समाजाचे नेतृत्व संभाजी पवार यांनी केले. त्यांनी मला राजकारणात आधार दिला. त्यांच्या निधनाने गोरगरिबांचा नेता हरपला आहे. -गोपीचंद पडळकर, आमदार भाजप
-------------
संभाजी पवार यांनी मारुती चौकातून कार्यकर्ते, नगरसेवक घडविण्याचे काम केले. महिलांचे प्रश्न घेऊन आम्ही रात्री-अपरात्री गेलो तरी आप्पा मदतीला धावत असत. असा नेता पुन्हा होणे नाही. त्यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. - विद्या स्वामी, सामाजिक कार्यकर्त्या.
------------------
१९७०पासून संभाजी पवार यांच्याशी मैत्री होती. त्यांनीच मला भाजपच्या शहर जिल्हाध्यक्षपदाची संधी देत राजकारणात आणले होते. आमची राजकारणापलीकडील मैत्री होती. आज मी एक मैत्र गमाविला आहे. -सुधीर गाडगीळ, आमदार
-------------
संभाजी पवार हे १९८६च्या सांगली विधानसभेच्या पोटनिवडणुकीत पहिल्यांदा विजयी झाले. ‘घराणेशाही’ हा शब्द कमालीचा लोकप्रिय झाला तो याच निवडणुकीत. या निवडणुकीची चर्चा देशभरातल्या माध्यमात झाली. आमदार फंड व त्यातून सार्वजनिक कामे केली जातात, हे सामान्य नागरिकांना पहिल्यांदा आप्पांच्या मुळेच कळले. मुंबईत आमदार निवास असतो आणि तिथे आपली राहण्याची सोय होते, हेही गोरगरिबांना पहिल्यांदाच कळले. संसदीय राजकारणात अनेक बाबी आप्पांनी आणल्या. काही आप्पांच्यामुळे आल्या. - ॲड के. डी. शिंदे