सांगली : सत्य, अहिंसा, अपरिग्रह अशा मूल्यांचा संदेश देणारे जैन धर्मियांचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या २६१७ व्या जन्मकल्याणकनिमित्त सांगलीत गुरुवारी सकाळी भक्तीमय वातावरण व जय जिनेंद्रच्या जयघोषात शोभायात्रा काढण्यात आली. यानिमित्त जैन सोशल ग्रुपच्यावतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. शासकीय रुग्णालय, अनाथाश्रम व वृद्धाश्रमात अन्नदान व फळांचे वाटप करण्यात आले.आमराईपासून शोभायात्रेस प्रारंभ झाला. शोभायात्रेत चित्ररथ, चांदीच्या रथात आकर्षक सजावटीने सजविलेली भगवान महावीर यांची प्रतिमा व पंचमेरू यांचा समावेश होता. दिगंबर, श्वेतांबरसह सर्व पंथाच्या धर्मियांनी शोभायात्रेत मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.
शेठ रा. ध. दावडा दिगंबर जैन बोर्डिंगच्या विद्यार्थ्यांनी फेटे बांधून व पांढरे पोशाख परिधान करून भगवान महावीर यांच्या घोषणा दिल्या. जैन महिलाश्रमच्या विद्यार्थिनीं, महिलांनीही फेटे बांधले होते. काननवाडी येथील झांजपथकासह नांद्रे येथील सत्यप्रेमी महिला झाजंपथक शोभा यात्रेचे आकर्षण ठरले.
पटेल चौक, गणपती मंदिर, टिळक चौक, कापडपेठ मार्गे वखार भागातील जैन मंदिराजवळ शोभायात्रेची सांगता झाली. या शोभायात्रेत खासदार संजयकाका पाटील, माजी खासदार प्रतिक पाटील, वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, माजी उपमहापौर प्रशांत पाटील-मजलेकर, माजी नगरसेवक लक्ष्मण नवलाई, दक्षिण भारत जैन सभेचे उपाध्यक्ष रावसाहेब पाटील, एसटी महामंडळ इंटक काँग्रेसचे अध्यक्ष रावसाहेब माणकापुरे, शांतिनाथ नंदगावे, शांतिनाथ पाटील, प्रा. राहुल चौगुले, प्रमोद पाटील, जैन सोशल ग्रुपचे स्वप्नील शाह, सुशांत शाह, तेजपाल शहा. चंद्रकांत मालदे, सुभाष शहा, शरद शहा, कमल चौधरी, अनिता पाटील आदी सहभागी झाले होते. जैन मंदिरात सकाळपासून १०८ कलशांचा भगवान महावीर यांचा अभिषेक करण्यात आला. तसेच अष्टक पूजा आणि आरती करण्यात आदी कार्यक्रम झाले.
३५० जणांचे रक्तदानजैन सोशल ग्रुपच्यावतीने कच्छी जैन भवन येथे आयोजित रक्तदान शिबिरात ३५० हून अधिकजणांनी रक्तदान केले. या महिलांची संख्या लक्षणिय होती. यावेळी दीपा दोशी, अश्विनी शहा, प्रसन्ना शहा, सुशांत शहा, अनिल शहा, साहिल शहा, निलेश शहा, वैशाली शहा, समीर शहा, नितेश शहा, ऋतुजा शहा, शीतल उपाध्ये व जैन युवा फोरमचे सदस्य उपस्थित होते. सिद्धीविनायक रक्तपेढी व एनएसआय रक्तपेढीने सहकार्य केले.