सांगली : अक्षता फुलांच्या...रुखवत पुस्तकांचा, विटा शहरात अनोखा विवाह सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 02:05 PM2018-09-13T14:05:45+5:302018-09-13T14:08:10+5:30
एकीकडे पायदळी तुडविल्या जाणाऱ्या अक्षता, दुसरीकडे अन्नाविना जाणारे भूकबळी...आधुनिकतेच्या, चंगळवादाच्या गर्दीत हरवत चाललेली माणसे आणि त्यांच्यापासून दुरावत चाललेली पुस्तके अशा विचित्र परिस्थितीत क्रांतीची एक ज्योत लावत मराठा समाजाने तांदळंऐवजी फुलांच्या अक्षता आणि वस्तुंऐवजी पुस्तकांचा रुखवत करून नवा पायंडा पाडला. वाचलेला तांदुळ अंधशाळा व अनाथालयाला दान करून खऱ्या पुण्यकर्माची प्रचिती दिली.
अविनाश कोळी
सांगली : एकीकडे पायदळी तुडविल्या जाणाऱ्या अक्षता, दुसरीकडे अन्नाविना जाणारे भूकबळी...आधुनिकतेच्या, चंगळवादाच्या गर्दीत हरवत चाललेली माणसे आणि त्यांच्यापासून दुरावत चाललेली पुस्तके अशा विचित्र परिस्थितीत क्रांतीची एक ज्योत लावत मराठा समाजाने तांदळंऐवजी फुलांच्या अक्षता आणि वस्तुंऐवजी पुस्तकांचा रुखवत करून नवा पायंडा पाडला. वाचलेला तांदुळ अंधशाळा व अनाथालयाला दान करून खऱ्या पुण्यकर्माची प्रचिती दिली.
मराठा सोशल ग्रुपचे मार्गदर्शक ए. डी. पाटील यांच्या नात्यातील एक विवाह सोहळा निश्चित झाला. मिरज तालुक्यातील करोली (एम) येथील यशवंत नामदेव पाटील यांची कन्या योगिता आणि आष्टा येथील दिलीप शिवाजी माने यांचे पुत्र रोहन यांचा हा अनोखा विवाहसोहळा विटा शहरात पार पडला.
विवाह सोहळ्याच्या तयारीवरून बराच विचारविनिमय झाला. सत्यशोधक चळवळीत काम करणाऱ्या ए. डी. पाटील यांनी वधु आणि वर पक्षाकडील सर्व कुटुंबियांचे प्रबोधन केले. या प्रबोधनाचा परिणाम म्हणजे समाजात क्रांतीचे बीज रोवणारा समारंभ म्हणून हा विवाह ओळखला गेला. या लग्नात अक्षतांच्या जागी फुले बरसली आणि संसारोपयोगी साहित्यांच्या रुखवताला हद्दपार करून ज्ञानरुपी संसारसमृद्धीचा मंत्र देत पुस्तकांचा रुखवत तयार झाला.
वऱ्हाडी मंडळींनाही हा सोहळा भारावून टाकणारा होता. फुलांचा सुंदर सडा याठिकाणी अक्षतांच्या माध्यमातून पडला होता. सुगंध सभागृहात आणि प्रत्येकाच्या मनामनातही दरवळ राहिला. प्रत्येक लग्नात केवळ १0 टक्केच अक्षता वधु-वरांच्या डोक्यावर, तर उर्वरीत अक्षता उपस्थित असलेल्या माणसांच्या डोईवर पडत असतात. मंगलाष्टका झाल्यानंतर तांदळांचा सडा पायदळी तुडविला जातो. हे सर्व अन्न वाया जाते. त्यामुळे ही चुकीची परंपरा हद्दपार करून समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्याचा निर्णय या कुटुंबियांनी घेऊन नवा पायंडा पाडला.
अंधशाळा, सुश्रुषा केंद्राला मदत
जेवणाशिवाय अतिरिक्त तांदुळ खरेदी करून तो या विवाहाच्या निमित्ताने मिरजेतील अंधशाळेला आणि संवेदना सुश्रुषा केंद्रास भेट म्हणून देण्यात आला. अंधशाळेचे प्रमुख विजय लेले, संतोष पाटील, ए. डी. पाटील यांच्यासह वधु-वरांचे पालकही यावेळी उपस्थित होते.
मंगलाष्टकांसह विचारांचा जागर
मंगलाष्टकांसह या विवाह सोहळ्यात विचारांचा जागरही करण्यात आला. अशा पद्धतीचा परंपरेला छेद देणारा विवाह सोहळा का करावा लागला, महात्मा फुले यांनी मांडलेले विचार काय आहेत, मराठा समाजाने प्रगतीचा कोणता मार्ग निवडायला हवा अशा अनेक बाजुंनी विचारमंथनही झाले.
वीस लाख तांदुळ दरवर्षी वाया...
लग्नसमारंभात मार्गदर्शन करताना ए. डी. पाटील म्हणाले की, प्रत्येक लग्नात सरासरी ५ किलो तांदळाच्या अक्षता केल्या जातात. एकट्या महाराष्ट्रात दरवर्षी सुमारे ४ लाख लग्ने होत असतात. प्रत्येक समारंभाचा विचार केला तर अक्षतांच्या माध्यमातून दरवर्षी आपण महाराष्ट्रात सुमारे २0 लाख किलो तांदूळ पायदळी तुडवून वाया घालवितो.
दुसरीकडे ठाणे जिल्ह्यातील जव्हार-मोवाडा येथे लहान मुले अन्न नाही म्हणून कुपोषित होत आहेत. हा विरोधाभास थांबणार तरी कधी? तब्बल १३५ वर्षापूर्वीच महात्मा फुले यांनी लग्नामध्ये तांदळाऐवजी फुले टाकायचा विचार मांडला होता. तो आज यानिमित्ताने आपण स्वीकारत आहोत.