लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : डिझेल, पेट्रोल आणि गॅसच्या दरात भरमसाट वाढ करून केंद्र शासनाने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. देशातील महागाई रोखण्यात मोदी सरकारला अपयश आल्याचा आरोप करीत मदनभाऊ युवा मंचाच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढून निषेध केला.
युवा मंचचे जिल्हाध्यक्ष आनंद लेंगरे, जिल्हा बँकेचे संचालक सिंकदर जमादार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी लेंगरे म्हणाले की, केंद्र सरकारच्या फसव्या घोषणांचा अतिरेक झाला आहे. प्रत्येकाच्या खात्यावर १४ लाख, वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याची घोषणा केली होती. मेक इन इंडियाचा बोजवारा उडाला आहे, तर कृषी कायदे करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोरोना महामारीत आधीच लोकांचा रोजगार गेला असून, महागाईही गगनाला भिडली आहे. केंद्र सरकारच्या कथनी आणि करणीमध्ये जमीन-अस्मानचा फरक आहे, महागाईबद्दल मोदी सरकार अवाक्षरही काढत नाही. या सरकारचा निषेध करण्यासाठी आंदोलन केल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आनंदराव पाटील, अय्याज मुजावर, नगरसेवक संतोष पाटील, माजी नगरसेवक दिलीप पाटील, कार्याध्यक्ष शीतल लोंढे, उपाध्यक्ष शेखर पाटील, तौफिक बिडीवाले, अमोल झांबरे, सुजित लकडे, राहुल कोळी, जुनेद महात, संजय कांबळे, राम कुट्टे, जयराज बर्गे, दिनेश सादिगले, प्रवीण निकम, प्रथमेश भंडे, संकेत आलासे, शरद गाडे उपस्थित होते.
फोटो ओळी : इंधन दरवाढ व महागाईविरोधात मदनभाऊ युवा मंचाच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. (छाया : नंदकिशोर वाघमारे)