सांगली : निमणी (ता. तासगाव) येथील शिवाजीनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झिरो शिक्षक नियुक्तीप्रकरणी मुख्याध्यापक अविनाश गुरव आणि केंद्रप्रमुख किसन चौगुले यांच्यावर निलंबनाचा बडगा उगारण्यात आला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी बुधवारी तसे आदेश दिले. दोघांची खातेनिहाय चौकशीही करण्यात येणार आहे. दरम्यान, याच शाळेतील सहशिक्षिकेला ‘कारणे दाखवा’ नोटीसही बजावण्यात आली आहे.२२ ऑक्टोबरला प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी शिवाजीनगर शाळेला भेट दिली होती, त्यावेळी मुख्याध्यापक अविनाश गुरव गैरहजर होते. त्यांच्या जागी अन्य महिला शिकवत असल्याचे आढळले. त्यानंतर गुरव यांना शिक्षण विभागाने ‘कारणे दाखवा नोटीस’ दिली होती.या प्रकरणी काही कार्यकर्त्यांनीही जिल्हा परिषदेकडे तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी ग्रामीण विकास प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर यांची एकसदस्यीय चौकशी समिती नियुक्त केली होती. घाणेकर यांनी सखोल चौकशी केली, गुरव यांच्यासह केंद्रप्रमुख चौगुले आणि शिकविणाऱ्या महिलेचे जबाबही घेतले. विद्यार्थ्यांकडून माहिती घेतली. शाळेचे दप्तर, हजेरीच्या नोंदी, विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका, गृहपाठाच्या वह्या पाहिल्या. चौकशीचा अहवाल धोडमिसे यांच्याकडे सादर केला.अहवालानुसार गुरव, चौगुले दोषी आढळले. त्यानुसार धोडमिसे यांनी दोघांच्याही निलंबनाचे आदेश दिले. गुरव यांच्यासोबत अध्यापन करणाऱ्या शिक्षिकेला व शाळा व्यवस्थापन समितीला ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावली.
शिक्षकांनी अध्यापनावर लक्ष केंद्रीत करावेधोडमिसे यांनी सांगितले, जिल्हा परिषदेने शिक्षकांवर शालेय कामकाजाव्यतिरिक्त अन्य कामांचा बोजा टाकलेला नाही. त्यामुळे त्यांनी शिक्षणाचा दर्जा वाढण्यासाठी काम करणे अपेक्षित आहे. गैरवर्तन आणि कामचुकारपणा करणाऱ्यांवर कारवाई अपरिहार्य आहे.
आम्ही संघटनेमार्फत शैक्षणिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सातत्याने प्रशासनाविरोधात आवाज उठवला होता. विद्यार्थी गणवेशांचे वितरण आणि शिक्षकांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी संघर्ष केला. त्यामुळे माझ्यावर प्रशासनाने आकसाने कारवाई केली आहे. याविरोधात न्यायालयात दाद मागणार आहे. - अविनाश गुरव, शिक्षक