सांगली : महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी सोमवारच्या महासभेत पार पडल्या. भाजपमधील खासदार संजयकाका पाटील गटाला स्वीकृतमध्ये अखेर संधी मिळाली.
भाजपमधून शेखर इनामदार, रणजित पाटील-सावर्डेकर व आरपीआयचे विवेक कांबळे यांची स्वीकृतपदी निवड झाली, तर कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसने मुस्लिम कार्ड काढत करीम मेस्त्री व आयुब बारगीर यांना संधी दिली. या सभेत स्थायी समिती, महिला, बालकल्याण व मागासवर्गीय, दलित वस्ती सुधार समितीच्या सदस्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.महापालिकेची महासभा महापौर संगीता खोत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. संख्याबळानुसार महापालिकेच्या पाच स्वीकृत नगरसेवकांची निवड सभेत करण्यात आली. यामध्ये भाजपचे तीन, तर कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या प्रत्येकी एक नगरसेवकाची निवड करण्यात आली. तिन्ही पक्षाच्या गटनेत्यांनी नावांचा बंद लिफाफा महापौर व आयुक्तांकडे दिला. महापौर संगीता खोत यांनी सदस्यांची नावे जाहीर केली.
भाजपकडून शेखर इनामदार यांचे नाव निश्चित झाले होते, तर उर्वरित दोन जागांसाठी विवेक कांबळे, रणजित पाटील-सावर्डेकर, अशोक सूर्यवंशी व बाबासाहेब आळतेकर यांच्या नावाची चर्चा होती. मात्र महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आरपीआयला संधी देण्याचे धोरण निश्चित केले. त्यांनी आरपीआयचे राज्य सचिव विवेक कांबळे यांना संधी दिली, तर दुसरीकडे खासदार संजयकाका पाटील गटाला संधी देत रणजित पाटील-सावर्डेकर यांची वर्णी लावली.कॉँग्रेसकडून करीम मेस्त्री, विजय पाटील यांच्या नावाची चर्चा होती; मात्र महापालिका निवडणुकीत कॉँग्रेसने मुस्लिम समाजाच्या तुलनेत त्यांच्या समाजातील थोड्याचजणांना उमेदवारी दिली असल्याचा आरोप होत होता. लोकसभा व विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने समाजाची नाराजी नको म्हणून कॉँग्रेसने मुस्लिम कार्ड ओपन करीत मेस्त्री यांना संधी दिली.
करीम मेस्त्री कॉँग्रेसचे प्रवक्ते आहेत. त्यांनी अनेक वर्षे पक्षाचे प्रामाणिक काम केले आहे. त्यामुळे त्यांना संधी देण्यात आली. राष्ट्रवादीकडून आयुब बारगीर व सागर घोडके यांच्या नावांची चर्चा होती. आ. जयंत पाटील यांनी आयुब बारगीर यांना संधी दिली.