सांगली जिल्ह्याचा बारावीचा निकाल ८६.५५ टक्के - : उत्तीर्णांमध्ये मुलींचीच बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 12:27 AM2019-05-29T00:27:34+5:302019-05-29T00:27:58+5:30
बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी आॅनलाईन जाहीर झाला. जिल्ह्याचा निकाल ८६.५५ टक्के लागला आहे. उत्तीर्णांमध्ये मुलींचे प्रमाण सर्वाधिक ९२.५४ टक्के आहे. सर्वाधिक निकाल मिरज तालुक्याचा ९१.८० टक्के लागला, तर कवठेमहांकाळ तालुक्यात सर्वात कमी (८२.१७ टक्के) निकालाची नोंद
सांगली : बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी आॅनलाईन जाहीर झाला. जिल्ह्याचा निकाल ८६.५५ टक्के लागला आहे. उत्तीर्णांमध्ये मुलींचे प्रमाण सर्वाधिक ९२.५४ टक्के आहे. सर्वाधिक निकाल मिरज तालुक्याचा ९१.८० टक्के लागला, तर कवठेमहांकाळ तालुक्यात सर्वात कमी (८२.१७ टक्के) निकालाची नोंद झाली. विद्यार्थी आणि पालकांनी आॅनलाईन निकाल नेट कॅफेमध्ये व मोबाईलवरून पाहिला. दरम्यान, गतवर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्याच्या निकालात चार टक्क्यांनी घट झाली आहे.
शिक्षण मंडळाने मंगळवारी आॅनलाईन निकाल जाहीर केला. मागीलवर्षी सांगली जिल्ह्याचा निकाल ९०.१२ टक्के लागला होता. यंदा त्यामध्ये चार टक्क्यांनी घट झाली आहे. जिल्ह्यात ३७ हजार ७४० विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज भरला होता. ३६ हजार ७६९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी ३० हजार ७४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णांमध्ये ९ हजार ६४ विद्यार्थ्यांना प्रथम, तर १८ हजार ५९२ विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणी प्राप्त झाली आहे.
जिल्ह्यात विज्ञान विभागाचा सर्वाधिक ९४.७४ टक्के, तर सर्वात कमी कला शाखेचा निकाल ७३.६९ टक्के लागला. वाणिज्य विभागाचा ९१.३२ टक्के निकाल लागला आहे. किमान कौशल्य व्यवसाय अभ्यासक्रमाच्या ८३.६२ टक्के निकालाची नोंद झाली. गेल्या काही वर्षांपासून बारावीच्या निकालात मुली आघाडीवर आहेत. यंदाही पुन्हा मुलींनीच बाजी मारल्याचे स्पष्ट झाले.
पुनर्परीक्षार्थींचा निकाल २१.८९ टक्के
जिल्ह्यातून बारावीसाठी एक हजार १५१ पुनर्परीक्षार्थी बसले होते. त्यापैकी २५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, एकूण निकालाची टक्केवारी २१.८९ टक्के इतकी आहे. ९ विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी, तर ३८ विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणी मिळाली. २०५ विद्यार्थी केवळ उत्तीर्ण झाले.
सतरा कनिष्ठ महाविद्यालये शंभरनंबरी
जिल्ह्यातील १७ उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांचा बारावी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. त्यामध्ये व्ही. आर. लोणारी कॉलेज (दिघंची, ता. आटपाडी), सूर्योदय उच्च माध्यमिक विद्यालय (खोजानवाडी, ता. जत), केंब्रिज (मिरज), पोदार इंग्लिश स्कूल (सांगली), डॉ. पतंगराव कदम कनिष्ठ महाविद्यालय (कुंडल, ता. पलूस), क्षितिज गुरुकुल विद्यानिकेतन कनिष्ठ महाविद्यालय, रजपूत, कोठारी गुजराती कनिष्ठ महाविद्यालय (सांगली), न्यू इंग्लिश स्कूल (शिराळा), पंचक्रोशी हायस्कूल (बोरगाव, ता. कवठेमहांकाळ), दादोजी कोंडदेव सैनिक शाळा (तासगाव), सागर पाटील कनिष्ठ महाविद्यालय (ढवळी, ता. वाळवा), शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालय (वाळवा), राजारामबापू पाटील कनिष्ठ महाविद्यालय (साखराळे, ता. वाळवा), के. बी. पाटील कनिष्ठ महाविद्यालय (ऐतवडे बुद्रुक, ता. वाळवा) यांचा समावेश आहे.
तालुकानिहाय निकालाची टक्केवारी
तालुका परीक्षार्थी उत्तीर्ण गुण (टक्के)
आटपाडी २११७ १७८० ८४.०४
जत ४२११ ३६८९ ८७.६०
कडेगाव १३१८ ११८३ ८९.७६
क.महांकाळ १७६१ १४४७ ८२.१७
खानापूर २५१८ २१६० ८५.७८
मिरज २१३४ १९५९ ९१.८०
पलूस २०३८ १८५८ ९१.१७
सांगली ८८७३ ७४७८ ८४.२८
शिराळा २०५१ १८०४ ८७.९६
तासगाव २८७८ २५६८ ८८.२३
वाळवा ५६१९ ४८१४ ८५.६७
एकूण ३५५१८ ३०७४० ८६.५५
जिल्ह्याचा शाखानिहाय निकाल
शाखा टक्केवारी
विज्ञान ९४.७४
कला ७३.६९
वाणिज्य ९१.३२
व्यावसायिक विषय ८३.६२