सांगली : इंधन दरवाढीविरोधात मंगळवारी सांगलीत शिवसेनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. दुचाकी ढकलत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणून जोरदार निदर्शने करण्यात आली.सांगलीच्या क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळयास अभिवादन करून मोर्चास सुरुवात झाली. 'वा रे मोदी तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल', 'या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय' अशा घोषणा देत शिवसैनिक सहभागी झाले होते.
कडकलक्ष्मीचा चाबूकही मोर्चाच्या अग्रभागी कडाडत होता. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा आल्यानंतर जोरदार निदर्शने करण्यात आली. शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, ऐन निवडणुकीच्या वर्षात डॉलरची किंमत वाढत आहे. याद्वारे सरकार परदेशी कंपन्यांकडून इलेक्शन फंड जमवत आहे, अशी कुजबुज सध्या देशात सुरू आहे.
तेलाचे भाव दिवसागणिक वाढत आहेत. भ्रष्टाचाराला कंटाळून जनतेने सत्ता परिवर्तन केले, पण निवडणूक काळात पैसे उभारायचे आणि डॉलरचे दर वाढवायचे ही काँग्रेसची निती भाजपनेही स्वीकारली आहे.
आंदोलनात जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, संजय विभूते, बजरंग पाटील, दिगंबर जाधव, शंभोराज काटकर आदी सहभागी झाले होते.