सांगली : पश्चिम महाराष्ट्र हा आता कॉंग्रेस-राष्ट्रवादी चा बालेकिल्ला राहिलेला नाही. यापुढे सांगली, सातारा, कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यात केवळ भाजपचेच अस्तित्व राहणार असल्यने जयंत पाटील यांनी या भागाचे नेतृत्व करण्याचे विसरावे, अशी टीका महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत केली.भाजप नेते नगरसेवक शेखर इनामदार यांचा वाढदिवस आणि महापालिकेतील भाजपचा विजयोत्सव मंगळवारी साजरा करण्यात आला. त्यावेळी इनामदार यांच्या नागरी सत्कारप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमास पालकमंत्री सुभाष देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, शिवाजीराव नाईक, विलासराव जगताप, महापौर संगीता खोत, भाजप जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार दिनकर पाटील, नितीन शिंदे, दिलीप सूर्यवंशी, दीपक शिंदे, सुरेश आवटी, गणेश गाडगीळ आदी उपस्थित होते.ते म्हणाले की, सांगली, कोल्हापूरचे विषय संपले आहेत. पुढील आठवड्यात साताऱ्यातही लक्ष घालणार आहोत. यापुढे तीनही जिल्ह्यांत फक्त भाजपच असेल. जयंत पाटील आता आजी नव्हे माजी नेते म्हणून ओळखले जातील.
महापालिकेच्या २0१३ मधील निवडणुकीत भाजपचा पराभव झाला होता. ती सल शेखर इनामदार यांच्या मनात होती. त्यामुळेच गेल्या पाच वर्षात त्यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली. भाजपच्या विजयाचे स्वप्न पाहिले. त्यामुळे महापालिकेत भाजपच्या विजयाचा झेंडा फडकला.
सांगली महापालिका जिंकल्यामुळे आता आम्हाला केरळ व तामिळनाडूची निवडणूकही सोपी वाटू लागली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीचे संयोजक म्हणूनही इनामदार यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे.
खासदार संजय पाटील यांना ते देशात सर्वाधिक मताधिक्क्याने निवडून आणतील. तसेच सांगली जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघ आम्ही जिंकणार आहोत. पश्चिम महाराष्ट्रातील सर्व खासदार आणि आमदार आमचेच असतील, याचीही खात्री वाटते.
सदाभाऊ खोत म्हणाले, भाजपला ज्या काळात विजयाची गरज होती, त्याचवेळी योग्य नियोजन करून इनामदार यांनी विजयासाठी प्रयत्न केले. यापुढेही त्यांच्यावर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपविण्यात येतील. खासदार पाटील म्हणाले, महापालिका निवडणुकीचे सुक्ष्म नियोजन इनामदार यांनी केले. आम्ही त्यांच्यासोबत होता. त्यामुळे विजयाचे ते शिल्पकार आहेत.आमदार गाडगीळ म्हणाले, महापालिकेत सत्ता स्थापन करण्याचा संकल्प इनामदार यांच्या मागील वाढदिवसाला आम्ही केला व तो पूर्ण केला. महापौर केबिनमध्ये त्यांचा आम्ही वाढदिवस साजरा केला. आता पुढे विकासाची जबाबदारी ते चोख पार पाडतील.