सांगली : भाजप-काँग्रेसमध्ये सभेत खडाखडी; भाजपकडून काँग्रेसच्या आक्रमणाला प्रत्युत्तर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 04:53 PM2018-09-10T16:53:19+5:302018-09-10T18:29:17+5:30
सांगली महापालिकेतील नव्या सत्ताधारी भाजपच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत सोमवारी विरोधी काँग्रेस व राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा घेतला. दोन्ही काँग्रेसच्या आक्रमणाला भाजपच्या नगरसेवकांनी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला.
सांगली : महापालिकेतील नव्या सत्ताधारी भाजपच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत सोमवारी विरोधी काँग्रेस व राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा घेतला. दोन्ही काँग्रेसच्या आक्रमणाला भाजपच्या नगरसेवकांनी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला.
आरोप-प्रत्यारोपांची सलामी झडली असून, दोन्ही पक्षांतील नगरसेवकांत खडाखडी सुरू झाल्याचे पाहायला मिळाले. आरोग्य, डास, कचरा उठाव, पाण्यावरून काँग्रेसने भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला, तर भाजपनेही त्यांना गेल्या पंधरा वर्षातील कारभाराचा जाब विचारत, आक्रमण परतवून लावले.
महापालिकेतील भाजपच्या इनिंगला सोमवारी खऱ्याअर्थाने सुरूवात झाली. पहिलीच महासभा असल्याने नव्या सदस्यांनाही उत्सुकता होती. विरोधी काँग्रेस व राष्ट्रवादीनेही भाजपवर हल्लाबोल करण्याची संधी दवडली नाही. सभेच्या सुरूवातीलाच संविधान जाळल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी दोन्ही काँग्रेसचे नगरसेवक गळ्यात फलक अडकवून व हातात संविधानाची प्रत घेऊन आले होते.
या घटनेचा निषेध करा, मगच सभा सुरू करा, असा पवित्रा काँग्र्रेस, राष्ट्रवादीने घेतला. त्यावरून दोन्ही बाजूचे नगरसेवक भिडले. अखेर महापौरांनी निषेधाचा ठराव घेण्याच्या सूचना प्रशासनाला केल्यानंतर सभेचे कामकाज सुरू झाले.
या सभेच्या अजेंड्यावर स्वीकृत सदस्य, स्थायी समिती, महिला व बालकल्याण समिती, मागासवर्गीय समिती सदस्यांच्या निवडीचा विषय असतानाही, दोन्ही काँगे्रस पक्ष आरोग्य, डास, डेंग्यू, पाणी या विषयांवर चर्चा घडवून आणण्यात यशस्वी ठरले.
प्रारंभी महापौर संगीता खोत यांनी, विषयपत्रिकेवरील विषय संपल्यानंतर चर्चा करू, असे आवाहन केले. पण त्याला न जुमानता विरोधकांनी पहिल्या सभेतच बाजी मारली.
विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांनी, शहरात प्रचंड डास झाले असून डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण वाढले आहेत. औषध फवारणी होत नाही. काँग्रेस नगरसेविकेलाच रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.
नागरिकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावर प्रशासनाने काय उपाययोजना केल्या? असा सवाल केला. त्यावर भाजपच्या भारती दिगडे यांनी, तुमचीच सत्ता होती, तुम्ही काय केले ते सांगा, असा पवित्रा घेतला. दिगडे यांच्या प्रश्नाला संजय मेंढे यांनी उत्तर देत, हा कुठल्या पक्षाचा विषय नाही. आम्ही भाजपला जाब विचारत नसून प्रशासनाने काय केले हे विचारत असल्याचे सांगितले.