सांगली : कुपवाड एमआयडीसीत ट्रक चालकास लुबाडले, तीन चोरट्यांविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 04:20 PM2018-09-10T16:20:44+5:302018-09-10T17:43:03+5:30
कुपवाड एमआयडीसीतील माणिक हार्डवेअरसमोर थांबलेल्या एका ट्रक चालकास तीन अज्ञात चोरट्यांनी धमकी देऊन ट्रकमधील शंभर किलोचा सात हजार रुपये किमतीचा लोखंडी खांब चोरी करून नेल्याची तक्रार कुपवाड पोलिसात सोमवारी सकाळी दाखल झाली असून, पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले आहे.
कुपवाड : कुपवाड एमआयडीसीतील माणिक हार्डवेअरसमोर थांबलेल्या एका ट्रक चालकास तीन अज्ञात चोरट्यांनी धमकी देऊन ट्रकमधील शंभर किलोचा सात हजार रुपये किमतीचा लोखंडी खांब चोरी करून नेल्याची तक्रार कुपवाड पोलिसात सोमवारी सकाळी दाखल झाली असून, पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी सुरेश नारायण चव्हाण (वय ४९, रा. कवठेमहांकाळ) हे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली एमआयडीसीतून ट्रकमधून (क्र. एमएच ०९ एल ३३७) लोखंडी खांब भरून रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास कुपवाड एमआयडीसीतील माणिक हार्डवेअरमध्ये आले होते. हे हार्डवेअर दुकान बंद असल्याने चव्हाण यांनी दुकानासमोर ट्रक थांबविला होता.
यावेळी तीन अज्ञात चोरटे चारचाकी वाहनातून आले. त्यांनी ट्रक चालक सुरेश चव्हाण यांना ट्रकमधून खाली उतरवून धमकी देऊन ट्रकमधील शंभर किलो वजनाचा सात हजार रुपये किमतीचा लोखंडी खांब काढून तो आपल्या वाहनातून घेऊन गेले.
याबाबत कुपवाड पोलिसात तीन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल असून पोलिसांनी याप्रकरणी एका संशयितास ताब्यात घेतले आहे. हवालदार प्रवीण यादव तपास करीत आहेत.