सांगली : गणपती पंचायतन संस्थानच्या गणपती मंदिरातील उत्सवास सुरुवात झाली असून मंगळवारी श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांच्याहस्ते महापूजा करण्यात आली. गणपती मंदिरासह सांगलीच्या राजवाड्यातील दरबार हॉलमध्ये १७ सप्टेंबरपर्यंत विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.गणपती मंदिरात १0 सप्टेंबरला सुरू झालेला उत्सव १९ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे, तर गणेश दुर्ग राजवाडा येथील उत्सव १३ ते १७ सप्टेंबर या कालावधित होणार आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला म्हणजेच गुरुवारी १३ सप्टेंबर रोजी येथील राजवाड्यात श्रींची प्रतिष्ठापना, दरबार व पान सुपारीचा कार्यक्रम होणार आहे.
विजयसिंहराजे पटवर्धन यांच्याहस्ते यावेळी महापूजा होणार आहे. त्यांनतर सलग तीन दिवस येथे सायंकाळी ७ ते ९ या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रम होणरा आहते. १४ रोजी भक्ती साळुंखे-लाटवडे प्रस्तुत निनाद वाद्यवृंद हा हिंदी, मराठी गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
१५ रोजी निलेश जोश्ी, संदीप वाडेकर प्रस्तुत स्वरनक्षत्र हा हिंदी, मराठी गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे. १६ रोजी सायंकाळी ५ वाजता महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम होणार असून त्यानंतर ७ वाजता स्वर धन्वंतरीचे हा हिंदी, मराठी भावगीत, भक्तीगीतांचा कार्यक्रम होईल.भाद्रपद शुद्ध अष्टमीस म्हणजेच १७ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता रथोत्सव आयोजित केला आहे. श्रींचा विसर्जन सोहळा राजवाड्यातून सुरू होईल. गणपती मंदिरमार्गे सरकारी घाटापर्यंत रथोत्सवाने विसर्जन होणार आहे.मंदिरांमध्ये दररोज पंचामृतपूजा, पुराण, गायन, महापूजा, नैवेद्य, बाहेरील व आतील छबिना, किर्तन, भजन, आरती, प्रक्षालन पुजा, आदी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.