Jayant Patil Vishal Patil : महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरुन रस्सीखेच सुरू आहे. ठाकरे गटाने पैलवान चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली असून, आता काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारीवरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विशाल पाटील यांच्या उमेदवारीला विरोध केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावर काल जयंत पाटील यांनी भाष्य केले.
“भाजपाबाबत जनतेच्या मनात संताप, लोकसभेला मविआ ३२ ते ३५ जागा जिंकेल”; जयंत पाटलांचा दावा
काल पत्रकार परिषदेत बोलताना जयंत पाटील म्हणाले, 'दादा-बापू हा चाळीस वर्षापुर्वीचा जुना वाद उकरून काढून काही लोक समाज माध्यमातून टीकाटिपणी करून पेटविण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र इतिहासातील घटनांचा विचार करून भविष्यातील कल्पनांना मूठमाती देऊ नये या मताचा मी असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. यावर आता काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी प्रत्युत्तर देत आम्ही वाद तेव्हाच संपवल्याचे सांगितले.
आज विशाल पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.आज विशाल पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी सांगलीत शक्तीप्रदर्शन केले. यावेळी विशाल पाटील यांनी भाषण केले. यावेळी बोलताना पाटील भावूक झाल्याचे दिसले.
विशाल पाटील म्हणाले, मी यावेळी ठरवलं कोणाच्या वादात जायचं नाही. काल कोणतर बोललं जुना वाद अजून आहे. वसंतदादांनी सांगितलं होतं की, ज्या दिवशी राजारामबापू वारले त्या दिवशी वाद संपला. आमच्या दृष्टीने ज्या दिवशी राजारामबापू वारले त्या दिवशी वाद संपलेला आहे, तुमच्या मनात अजून वाद असेल तर तो तुम्ही संपवावा. आमच्याकडून यापुढे वादाची भावना असणार नाही', असंही विशाल पाटील म्हणाले.
"आम्ही आज येत असताना राजारामबापू यांच्या पुतळ्याला नमन करुन आशिर्वाद घेऊन मंचावरसुद्धा त्यांचा फोटो लावून आम्ही या ठिकाणी प्रचाराला शुभारंभ केला आहे. हा वाद मिटल्याचे विशाल पाटील यांनी सांगितले.
चंद्रहार पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर
काल ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी उमेदवारीवरुन विशाल पाटील यांच्यावर टीका केली. या टीकेला प्रत्युत्तर देताना पाटील म्हणाले, काल कोणीतरी आरोप केला शेतकऱ्याचा मुलगा खासदार झालेला पाहवत नाही का? या वसंतदादा घराण्याने शेतकऱ्यांच्या मुलांना पद द्यायचं काम केलं आहे. आमचीही तिच भावना आहे की शेतकऱ्याच्या मुलानं आमदार, खासदार झालं पाहिजे. पण, शेतकऱ्याच्या मुलाला फसवून बळी त्याचा बळी नाही गेला पाहिजे ही सुद्धा पाहायची आमची जबाबदारी आहे, असा टोला विशाल पाटील यांनी लगावला.
'त्या पैलवानांना माझी विनंती आहे, राऊत साहेब आधीच येऊन गोंधळ घालून गेलेत. सांगली सुसंस्कृत आहे इथं भाषा शोभणारी बोलावी, आपल्यावर खूप चांगले संस्कार आहेत. त्यांच्या पुस्तकातील शब्द आणि भावना वापरुन लोक आणि चिडीला पेटतील त्यामुळे आता राजकारण करायचं असेल तर भाषा संभाळून करायची. ज्या शिवसेनेला आवाज वसंतदादांनी घडवला, तोच आवाज आता त्याच वसंतदादांच्याविरोधात वापरला जातोय हे दुर्दैवी आहे, पण आम्हाला याचं भान आहे ही लढाई भाजपाविरोधात आहे आपल्या एकमेकांच्याविरोधात नाही, म्हणून आम्ही भाजपचा पराभव झाला पाहिजे या हेतून एकत्र आलो आहोत, असंही विशाल पाटील म्हणाले. (Sangli Lok Sabha Election 2024)