सांगली महापालिका स्थायी समितीत जुन्या-नव्यांचा मेळ : सोळा जागांवर दिग्गजांची वर्णी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 11:34 PM2018-09-10T23:34:12+5:302018-09-10T23:35:12+5:30
सांगली महापालिकेच्या स्थायी समितीवर सोमवारी झालेल्या सभेत सोळा सदस्यांची निवड करण्यात आली. यात भाजपचे नऊ, कॉँग्रेसचे चार, तर राष्ट्रवादीचे तीन सदस्य आहेत. तिन्ही पक्षांनी अनुभवी नगरसेवकांसह नव्या चेहऱ्यांनाही संधी दिली आहे
सांगली : महापालिकेच्या स्थायी समितीवर सोमवारी झालेल्या सभेत सोळा सदस्यांची निवड करण्यात आली. यात भाजपचे नऊ, कॉँग्रेसचे चार, तर राष्ट्रवादीचे तीन सदस्य आहेत. तिन्ही पक्षांनी अनुभवी नगरसेवकांसह नव्या चेहऱ्यांनाही संधी दिली आहे. स्थायी समितीसह महिला व बालकल्याण समितीच्या सोळा, तसेच मागासवर्गीय व दलित वस्ती सुधार समितीच्या अकरा सदस्यांची निवड करण्यात आली.
महापौर संगीता खोत यांच्या अध्यक्षतेखालील महासभेत स्थायी समिती, महिला व बालकल्याण समिती व मागासवर्गीय व दलित वस्ती सुधार समिती सदस्यांची निवड करण्यात आली. स्थायी समितीसाठी भाजपचे गटनेते युवराज बावडेकर, काँग्रेसचे गटनेते उत्तम साखळकर व राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी त्यांच्या सदस्यांची नावे बंद पाकिटातून महापौर संगीता खोत यांच्याकडे सादर केली. खोत यांनी ही पाकिटे उघडून त्यातील नावे जाहीर केली.
स्थायी समितीवर भाजपकडून अजिंक्य पाटील, भारती दिगडे, लक्ष्मण नवलाई, स्वाती शिंदे, संजय कुलकर्णी, प्रकाश ढंग, संदीप आवटी, पांडुरंग कोरे व गणेश माळी, काँग्रेसकडून संजय मेंढे, वर्षा निंबाळकर, अभिजित भोसले, मनोज सरगर, तर राष्ट्रवादीकडून रजिया काझी, विष्णू माने व योगेंद्र थोरात यांची निवड करण्यात आली. भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादीने या निवडी करताना जुन्या व नवीन नगरसेवकांचा ताळमेळ साधला आहे. महिला व बालकल्याण समितीवर १६ सदस्यांची निवड करण्यात आली. यात भाजपकडून अनारकली कुरणे, सुनंदा राऊत, गीता सुतार, गीतांजली सूर्यवंशी, शांता जाधव, नसीमा नाईक, मोहना ठाणेदार, गायत्री कल्लोळे, लक्ष्मी सरगर यांची, काँग्रेसकडून रोहिणी पाटील, आरती वळवडे, मदिना बारुदवाले, शुभांगी साळुंखे, तर राष्ट्रवादीकडून स्वाती पारधी, सविता मोहिते व पवित्रा केरीपाळे यांची निवड करण्यात आली.
मागासवर्गीय व दलित वस्ती सुधार समितीवर अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या प्रवर्गातून निवडून आलेल्या सर्वच नगरसेवकांची निवड झाली. यात भाजपच्या अनिता व्हनखंडे, आनंदा देवमाने, जगन्नाथ ठोकळे, सुब्राव मद्रासी, अप्सरा वायदंडे व स्नेहल सावंत, सोनाली सागरे, काँग्रेसकडून कांचन कांबळे, तर राष्ट्रवादीचे शेडजी मोहिते, सविता मोहिते व योगेंद्र थोरात यांचा समावेश आहे.
समितीचे नाव ‘समाजकल्याण’ करा
जगन्नाथ ठोकळे म्हणाले, उच्च न्यायालयाने दलित हा शब्द न वापरण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार केंद्र शासनाने परिपत्रक जारी केले आहे. त्यामुळे महापालिकेच्या मागासवर्गीय व दलित वस्ती सुधार समितीचे नाव बदलून त्याऐवजी समाजकल्याण समिती असे नामकरण करावे. अन्य महापालिका व नगरपालिकांमध्ये समाजकल्याण हाच शब्द वापरला जात आहे. याबाबत आयुक्तांनी शासनाची परवानगी घेऊन नावात बदल करण्याचे आश्वासन दिले.
अनुसूचित जमाती सदस्याला सामावून घ्या...
महापालिकेच्या निवडणुकीत अनुसूचित जमाती (एसटी) या प्रवर्गासाठी राष्ट्रवादीच्या स्वाती पारधी निवडून आल्या आहे. एसटी प्रवर्गातील त्या एकमेव प्रतिनिधी आहेत. त्यामुळे त्यांना मागासवर्गीय समितीत सामावून घ्यावे किंवा त्यांना स्वतंत्र पद, अधिकार द्यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या योगेंद्र थोरात यांनी केली. आयुक्तांनी, याबाबत शासनाचे मार्गदर्शन घेऊन महिन्याभरात निर्णय घेण्याची ग्वाही दिली.
सभापतीपदी अजिंक्य पाटील?
स्थायी समितीवर भाजपकडून वर्णी लागलेल्यांमध्ये भारती दिगडे, पांडुरंग कोरे, अजिंक्य पाटील यांचा समावेश आहे. सर्वजण सभापती पदाचे दावेदार आहेत. अजिंक्य पाटील हे माजी आमदार दिनकर पाटील यांचे पुत्र आहेत. भाजपच्या विजयात दिनकर पाटील यांचाही मोठा वाटा आहे. त्यामुळे सभापतीपदी अजिंक्य पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.